पिंपरी चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या भागात सध्या १० रुपयांचे नाणे चलनातून बंद होणार असल्याची  चर्चा रंगली आहे. परिणामी, नागरिकांनी आपल्याजवळील १० रुपयांची नाणी लवकरात लवकर खर्च करण्यावर भर देत आहेत. नागरिकांमध्ये पसरलेल्या या अफवेमुळे किरकोळ व्यापारी आणि दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोदी सरकारने अचानकपणे नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या निर्णयानंतर काही दिवसांत १० रुपयाचे नाणे चलनातून बंद झाल्याची चर्चा रंगली. ही अफवा राज्यासह देशभरात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करत भारतीय रिझर्व्ह बँकेने दूर १० रुपयाचे जूने तसेच नवे नाणे बंद करण्यात आलेले नाही, असे  स्पष्ट केले. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या स्पष्टीकाणाचा विसर पडल्याचे दिसते.

त्यामुळेच पुन्हा एकदा १० रुपयाचे नाणे बंद होणार असल्याची अफवा पिंपरी चिंचवड शहरात पसरल्याचे पाहायला मिळते. लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडून सध्या १० रुपयाचे नाणे बंद होणार असल्याची चर्चा आहे. या अफवेनंतर गृहिणींनी या नाण्यांच्या स्वरुपात साठवलेली हजारो रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. भाजीवाला, किराणा दुकानदार, मेडिकल, किंवा खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर मिळेल त्या ठिकाणी आपल्याकडील नाणे नागरिक खर्च करताना दिसते. दुकानदार  १० रुपयाचे नाणे घेत आहेत. मात्र, दुकानदारांकडून १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास ग्राहक साफ नकार देत आहेत. परिसरातील व्यापाऱ्यांकडे तब्बल ५ हजार ते १० हजार एवढी नाणी साठली आहेत. त्यामुळे छोटा व्यापाऱ्यांसह दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे.

काही किराणा दुकानदार भविष्याचा विचार करून १० रुपयाचे नाणे घेत नसल्याचेही समोर आले. तर काहीजण कमीत कमी नाणी स्वीकारत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरही १० रुपयाचे नाणे बंद झाल्याची सद्या जोरदार अफवा पसरताना दिसते.  नागरिकांमध्ये संभ्रम असला तरी आरबीआयच्या स्पष्टीकरणानुसार १० रुपयांचे  नाणे बंद झाल्याची गोष्ट खोटी आहे.

Story img Loader