पवारांचे प्रभावक्षेत्र म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाले. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा बंडखोर नगरसेवक महेश लांडगे यांनी पराभव केला. मोदी लाट आणि शिवसेनेचा झंझावात असतानाही अपक्ष निवडून आल्याने महेश लांडगे यांचा राजकारणातील ‘भाव’ बराच वाढला. सत्ताधारी भाजपमध्ये येणार की पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार, याविषयी त्यांनी जाणीवपूर्वक संभ्रमावस्था करून ठेवली आणि बरीच गणिते त्यांनी साध्य करून घेतली. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये येणार असे म्हणतात. त्यामुळे भाजपची ताकद वाढेल की डोकेदुखी, याविषयी साशंकताच आहे.

मर्दानी खेळांची आवड असलेल्या ‘दहा गाव दुसरी, एक गाव भोसरी’ येथील महेश लांडगे हा पहिलवान गडी राजकारणाच्या आखाडय़ात उतरला आणि नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्षपद भूषवत आमदारकी पटकावली. सद्य:स्थितीत महेश लांडगे शहराच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. तसे पाहिल्यास िपपरी पालिकेच्या राजकारणात कायमच पाहुण्यारावळय़ांचा आणि भोसरीचा वरचष्मा राहिला आहे. भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे हे शहराचे पहिले महापौर आणि पहिले आमदारही झाले. शहराला अनेक स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर भोसरीनेच दिले आहेत. विलास लांडे दहा वर्षे आमदार होते. त्यांचा पराभव केलेल्या महेश लांडगे यांच्याकडे आता आमदारकी आहे. राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र, मोदी लाट आणि शिवसेनेचा झंझावात असतानाही अपक्ष आमदार झाल्यामुळे चर्चेत आलेले लांडगे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लांडगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे भाजप वर्तुळातून सांगण्यात येते. लांडगे भाजपमध्ये आल्यानंतर बरीच समीकरणे बदलणार आहेत.

भाजपचे बळ त्याचप्रमाणे अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळेच पक्ष सोडणाऱ्या एकेकाची कुंडली काढतो, अशी भाषा अजित पवारांनी सुरू केली आहे.

‘पहिलवानकी ते आमदारकी’ हा लांडगे यांचा प्रवास लक्षवेधी आहे. महेश लांडगे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे. एनएसयूआयचे ते िपपरी शहराध्यक्ष होते. काँग्रेसच्या तिकिटावर २००२ मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली, तेव्हा विलास लांडे यांच्याकडून त्यांचा दारुण पराभव झाला. एकमेकांच्या नात्यात असतानाही ते परस्परांच्या विरोधात लढल्याने अनेक जण गोत्यात आले होते. पुढे २००४च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात ‘पॅचअप’ झाले व महेश लांडगे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले. तत्कालीन शिवसेनेचे आमदार गजानन बाबर यांचा विलास लांडे यांनी पराभव केला. त्यानंतर लांडे यांनी स्वत:च्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्या पोटनिवडणुकीत महेश लांडगे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणण्यात आले. त्यानंतरचा बराच काळ महेश लांडगे हे विलास लांडे यांचे खंदे समर्थक होते. मात्र, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नव्हत्या. दोघांत खटके उडू लागले. स्थायी समिती अध्यक्ष व महापौरपदाच्या स्पर्धेत महेश लांडगे यांना डावलण्यात आले, त्यातून लांडगे दुरावत गेले. २००९च्या विधानसभा निवडणुकीतच लांडे व लांडगे यांच्यात सामना होणार होता. बराच गाजावाजा झाला, उलथापालथ झाली. प्रत्यक्षात तसे झाले नाही. पुढील पाच वर्षे लांडगे व लांडे यांच्यातील शीतयुद्ध सुरूच राहिले, वेगवेगळय़ा पद्धतीने ते दिसत होते. त्यात अनेक जण पोळून निघाले. अखेर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ते समोरासमोर आलेच. विद्यमान आमदार असल्याने विलास लांडे यांनाच राष्ट्रवादीने पुन्हा उमेदवारी दिली. गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झालेल्या शिवसेनेच्या सुलभा उबाळे त्यांच्याविरोधात होत्या. लांडे आणि लांडगे यांच्यातील भावकी-गावकीच्या वादात उबाळे निवडून येतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. ‘गाववाल्या’ मंडळींच्या विरोधात असणाऱ्या अनेकांनी तशी ‘फिल्डिंग’ही लावली होती. मात्र, समस्त लांडे विरोधक लांडगे यांच्या पाठीशी एकवटले आणि महेश लांडगे आमदार झाले. राज्यात भाजपची सत्ता आली, मात्र स्वबळासाठी त्यांना काही आमदार कमी पडत होते. त्यामुळे अपक्ष महेश लांडगे यांचा भाव वधारला. मुख्यमंत्र्यांनी पाठिंब्यासाठी गोंजारल्याने ते भाजपच्या गळाला लागले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दोन वर्षांत लांडगे यांची सरकारदरबारी बरीच कामे होऊ लागली. ‘क्रीडा प्राधिकरण’ हे मंत्र्यांचा दर्जा असलेले खाते लांडगे यांना देण्याचे गाजर आहेच आहे. लांडगे येणार, अशी चर्चा भाजपमध्ये दोन वर्षांपासून आहे. मात्र, भाजपशी सोयरीक करताना त्यांनी राष्ट्रवादीशी असलेले नाते कायम ठेवले होते. त्यामुळे बरीच संभ्रमावस्था होती. ती त्यांनी जाणीवपूर्वक ठेवली होती. अखेर, पालिका निवडणुकांमुळे एक स्पष्ट भूमिका त्यांना घ्यावी लागणार होती. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडे सध्या आमदार लक्ष्मण जगताप व खासदार अमर साबळे यांच्याकडे नेतृत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. महेश लांडगे यांच्यामुळे भाजप नेतृत्वाला एक भक्कम बाजू मिळणार आहे. लांडगे समर्थकांचा मोठा गट भाजपमध्ये येणार असल्याने भोसरी मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.

एकीकडे पक्षाची ताकद वाढणार असली तरी काही प्रमाणात डोकेदुखी वाढणारही आहे. लांडगे यांचे विलास लांडे यांच्याशी जमत नाही. तेच लांडे हे लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय आहेत. आझम पानसरे यांचे जगतापांशी जमत नाही, मात्र लांडगे-पानसरे यांच्यात सख्य आहे. जगताप आणि बारणे यांच्यातून विस्तव जात नाही, मात्र लांडगे-बारणे-पानसरे संपर्कात असतात. याशिवाय, महेश लांडगे भाजपमध्ये आले असे गृहीत धरल्यास त्यांच्या भोसरीपट्टय़ातील गणिते बदलणार आहेत. भाजप आणि शिवसेनेला स्वतंत्रपणे लढावे लागेल, अशा पद्धतीची वाटचाल सुरू आहे. युती झाल्यास काय करायचे, अशी भाजप-सेनेत मारामार सुरू असताना लांडगे समर्थकांना कशा प्रकारे सामावून घ्यायचा, यासारखे नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेचे वेध आतापासूनच लागले आहेत. त्यावरून शिवाजीराव आढळराव यांच्याशी त्यांचा संघर्ष केव्हाच सुरू झाला आहे. शहराध्यक्ष जगताप यांच्याशी महेश लांडगे यांचे कितपत जमू शकेल, याविषयी त्यांच्या प्रवेशापूर्वीच पक्षात साशंकता आहे.

Story img Loader