पक्षाने दिलेल्या आदेशानुसार महापौर वैशाली बनकर यांनी सोमवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यात अडीच वर्षांत दोन महिलांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून त्यानुसार महापौर बनकर यांना राजीनामा देण्याबाबत सोमवारी सकाळी सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी बनकर यांनी महापालिका आयुक्त आणि नगरसचिवांकडे राजीनामापत्र सुपूर्द केले.
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाली आणि सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रवादीला महापौरपदासह बहुतेक सर्व महत्त्वाची पदेही मिळाली. पुण्याचे महापौरपद पहिल्या अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असून त्या आरक्षणानुसार वैशाली बनकर यांना महापौर पदाचा बहुमान मिळाला. गेल्या सतरा महिन्यांमध्ये शहरासाठी अनेकविध विकासकामे केली आणि संपूर्ण कारभार पारदर्शी पद्धतीने केला असा दावा बनकर यांनी पत्रकार परिषदेत केला. स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेता सुभाष जगताप, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महापौरपदी नियुक्ती करत असतानाच हे पद दोन महिलांना सव्वा-सव्वा वर्षांसाठी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. मला त्यापेक्षा दोन महिने जास्तच मिळाले. त्यामुळे कामाची आणखी संधी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. दिलेल्या संधीचा उपयोग अधिकाधिक सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी करा, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. त्यानुसार काम केल्याचेही बनकर यांनी सांगितले.
पुढे काय होणार?
कायद्यातील प्रक्रियेनुसार आता महापौरांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी तीन दिवसांच्या सूचनेनुसार खास सभा बोलवावी लागेल. स्थायी समितीमधील सदस्यांच्या मागणीनुसार अशी सभा बोलावता येते. या खास सभेत महापौरांचा राजीनामा मंजूर केला जाईल. त्यानंतर त्याची माहिती नगरसचिवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल. पुढील प्रक्रियेत महापौरनिवडीसाठी महापालिकेची खास सभा जिल्हाधिकारी बोलावतील. त्या सभेत महापौर निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल. नव्या महापौराच्या निवडीपर्यंत वैशाली बनकर याच महापौर म्हणून काम पाहतील.
अशी झाली बदलाची प्रक्रिया
पुण्यातील महापौर बदलाबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारीच घेतला होता. मात्र, त्या दिवशी झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या वा सायंकाळी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्याबाबत सूतोवाच करण्यात आले नव्हते. या निर्णयाबाबत रविवारी शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांना कल्पना देण्यात आली. त्यांनी सोमवारी सकाळी महापौर बनकर यांना राजीनाम्याबाबत सांगितले. तसेच महापौर बदलाबाबत त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनाही कल्पना दिली.
 पिंपरीत राजकीय धुळवड टाळली
पुण्याच्या महापौरांना राजीनामा देण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला असला, तरी िपपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांना मात्र महापौरपदी कायम ठेवण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर िपपरी बालेकिल्ल्यात राजकीय धुळवड नको आणि संभाव्य उमेदवार असू शकणारे महापौरांचे पती आमदार विलास लांडे यांची नाराजी नको म्हणून महापौरांना अघोषित मुदतवाढ देण्याचे धोरण असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नेत्यांनी आदेश दिल्यास त्याचे पालन करू, एवढीच प्रतिक्रिया महापौरांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
िपपरीत पहिल्या अडीच वर्षांकरिता सर्वसाधारण गटातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित होते. ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर लांडे यांना महापौरपद देण्यात आले. मात्र, ‘आमदारपत्नी’ हाच निकष महत्त्वाचा ठरला होता. त्यापूर्वी १९९७ मध्ये महापौरपदाने हुलकावणी दिलेल्या झामाबाई बारणे व उद्योजक आबा ताकवणे यांची पत्नी नंदा ताकवणे या प्रमुख दावेदारांसह अनेक नगरसेविकांनी पदावर दावा केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडे यांना संधी दिली. इच्छुकांच्या मुलाखतींचा फार्स करत अजितदादांनी अन्य इच्छुक नाराज होऊ नयेत, यासाठी सव्वा वर्षांनंतर पुढचे पाहू, अशी वेळ मारून नेली होती. ताकवणे यांच्या बरोबरीने निवडून आलेले राजू मिसाळ यांना उपमहापौरपद देऊन ताकवणे यांची संभाव्य स्पर्धा सुरूवातीलाच संपवण्यात आली होती.
सव्वा वर्षांत मोहिनी लांडे यांनी अनुभवाच्या जोरावर चांगले काम केले. यापूर्वीच्या महापौरांना झालेला त्रास मोहिनी लांडे यांना झाला नाही. सव्वा वर्षांनंतर त्या महापौरपद सोडण्याची कोणतीही शक्यता नव्हती आणि झालेही तसेच. यापूर्वी, मंगला कदम आणि योगेश बहल यांना सव्वा वर्षांची मुदत असताना अडीच वर्षे संधी दिली होती. त्यामुळे ‘जो न्याय बहल व कदम यांना, तोच आम्हालाही’ असा सूर विलास लांडे यांनी सुरूवातीपासूनच लावला होता. राष्ट्रवादीने निवडणुकांची बांधणी सुरू केली असताना महापौर बदलाच्या विषयामुळे पिंपरी बालेकिल्ल्यात आयतेच दुखणे वाढू शकते. त्यामुळे महापौर बदलाची मागणी करणाऱ्या नगरसेवकांना अजितदादांनी थेट नकारघंटा दिल्याचे सांगितले जाते.
परिणामी, पुण्यात खांदेपालट होत असताना पिंपरीत महापौरांना अघोषित मुदतवाढ असल्याचे मानले जाते. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ते उत्सुक नाहीत. लोकसभेत न लढल्यास ते भोसरी विधानसभा लढू शकतात. मागील वेळी महिला उमेदवारास संधी द्यायची म्हणून राष्ट्रवादीने भोसरीत मंगला कदम यांना उमेदवारी दिली होती. यापुढेही तोच निकष कायम राहिल्यास मोहिनी लांडे यांचे नाव अग्रक्रमावर राहील. या सर्व गोष्टी लक्षात घेता मोहिनी लांडे यांना पदावरून न काढता त्यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली असावी, असे राष्ट्रवादी गोटातून सांगितले जाते.

Story img Loader