प्रमुख पाहुण्यांना झालेला प्रचंड उशीर, अस्वस्थ संयोजक, लांबलेली व कंटाळवाणी भाषणे, वैतागलेले कार्यकर्ते अशा वातावरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदवीधर सदस्यनोंदणी अभियानास सोमवारी चिंचवडला सुरूवात झाली. मेळाव्यात प्रचंड हुल्लडबाजी झाली. शांत राहा, पक्षशिस्त पाळा, असे आवाहन करणारे युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील अखेर या गोंधळामुळे पुरते वैतागले.
चिंचवडच्या ‘दर्शन हॉल’ मध्ये झालेल्या नोंदणीच्या उद्घाटनासाठी उमेश पाटील प्रमुख पाहुणे होते. चारची वेळ असताना ते अडीच तास उशिराने म्हणजे पावणेसातला आले. त्यांची वाट पाहून सगळेच वैतागले होते, त्यात भाषण करणाऱ्यांची यादी वाढली, तसेच त्या भाषणांची लांबीही वाढली. कार्यकर्त्यांना थांबवून धरण्यात संयोजकांची तारांबळ उडत होती. पाटील भाषणाला उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि शिट्टय़ा, टाळ्या व घोषणाबाजीला सुरूवात झाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या भाषणात अडथळे येत होते. ‘एकच वादा’..ही घोषणा वेगवेगळ्या ‘दादां’चे नाव घेऊन युवक देत होते. वाहतूक कोंडीत अडकलो व बैठकीमुळे उशीर झाल्याचे सांगत माफी मागून पाटील यांनी, भाषण ऐकण्याची मानसिकता युवकांमध्ये नसते, अशी सुरूवात केली, त्याचा प्रत्यय त्यांना स्वत:लाच आला. गोंधळामुळे त्यांना भाषण सतत थांबवावे लागत होते. फक्त राज ठाकरेंच्या सभेला जल्लोष नसतो तर राष्ट्रवादीच्या सभांनाही असतो, असे विधान त्यांनी केले. मात्र, तो जल्लोष नव्हता तर गोंधळ होता, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा शांत रहा, बसून घ्या, हा कोपरा शांत करा, मागे शांतता राखा, असे आवाहन ते वारंवार करत होते. तरीही दाद मिळत नव्हती. अखेर, तशाच परिस्थितीत त्यांनी भाषण पूर्ण केले.
पाटील म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आपण मिरवतो. सर्व संस्था आपल्याकडे, पक्षाचे आमदार, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य आपले असतानाही गेल्या पदवीधर निवडणुकीत पराभूत झालो, ही शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांना मान खाली घालायला लावणारी बाब आहे. ही नामुष्की यंदा दूर करू व पदवीधर आमदार निवडून आणू, त्यासाठी सर्वानी कष्ट घ्यावे. या वेळी शहराध्यक्ष योगेश बहल, युवक अध्यक्ष मयूर कलाटे, पक्षनेत्या मंगला कदम, शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे, सदस्य फजल शेख, चेतन घुले, नाना शिवले, शरद बुट्टे पाटील, राजेश पाटील वाठारकर, नगरसेवक शमीम पठाण, वैशाली काळभोर, नीलेश पांढारकर, किरण मोटे, नीलेश डोके, डॉ. गणेश अंबिके आदी उपस्थित होते.

Story img Loader