पुण्यातील कोणता भाग स्त्रियांसाठी किती सुरक्षित आहे याचे चित्र समोर येणार आहे. ‘सम्यक संवाद व संसाधन केंद्रा’तर्फे शहरातील तब्बल दोन हजार वेगवेगळ्या ठिकाणांचे ‘सुरक्षा लेखापरीक्षण’ (सेफ्टी ऑडिट) करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात संध्याकाळी महिलांना सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती आहे का, याचा अभ्यास या लेखापरीक्षणावरून केला जाणार आहे. सोमवारी येरवडय़ापासून या लेखापरीक्षणाला सुरूवात झाली.
संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आनंद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्लीतील ‘सेफ्टिपिन’ या सामाजिक संस्थेने ‘सेफ्टिपिन’ याच नावाचे एक अँड्रॉइड अॅप तयार केले आहे. शहराचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यासाठी माहिती भरण्याची सोय या अॅपवर आहे. हे अॅप वापरून ‘सम्यक’चे कार्यकर्ते पुण्याच्या विविध भागात फिरून तिथे त्या-त्या वेळी सुरक्षेच्या संदर्भात जे चित्र दिसेल त्याची नोंद करणार आहेत.
पवार म्हणाले, ‘‘विविध भागांची तपासणी करण्यासाठी संध्याकाळी सहा ते दहा ही वेळ ठरवण्यात आली असून पुढील दहा आठवडे हा प्रकल्प सुरू राहणार आहे. ‘सम्यक’च्या आठ कार्यकर्त्यांना ‘सेफ्टिपिन’ संस्थेतर्फे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षण करणाऱ्या व्यक्तीने केवळ असुरक्षित जागाच शोधण्याचा दृष्टिकोन घेऊन पाहणी न करता तटस्थ राहून नोंदी टिपाव्यात यासाठी हे प्रशिक्षण दिले गेले. एखाद्या स्त्रीला शहरातील अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर ते ठिकाण सुरक्षित आहे का, तिथले रस्ते, वाहतुकीच्या सुविधा कशा आहेत, पथदिवे आहेत का, अशा गोष्टींची माहिती तिला आधीच मिळू शकेल. त्याआधारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेता येईल. आम्ही या प्रकल्पासाठी शहराचे सोळा भाग केले असून त्यातील प्रत्येक भागाचे दहा उपभाग केले आहेत. या सर्व ठिकाणी फिरून आमचे कार्यकर्ते पाहणी करणार आहेत.’’
सुरक्षा लेखापरीक्षणाचा अहवाल पालिकेला, तसेच पोलिसांना पाठवून त्या- त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा घडून येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
 
या गोष्टी तपासणार-
– लोकवस्ती किती आहे?
– रस्त्यांवर पुरेसा प्रकाश आहे का?
– वाहतुकीच्या सुविधा कोणत्या आहेत?
– रस्त्याची अवस्था कशी आहे?
– रस्त्यावर लोकांची वर्दळ आहे का?
– पुरूष आणि स्त्रियांचे रस्त्यावर दृष्टीस पडणारे प्रमाण किती?
– त्या वेळी त्या ठिकाणी सुरक्षित असल्यासारखे वाटते का?