पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या भाषणापासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दूर राहणे पसंत केले आहे. संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमात सबनीस यांनी अध्यक्ष म्हणून केलेले भाषण हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याची भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रथेनुसार संमेलनाध्यक्षांचे भाषण हे साहित्य महामंडळ प्रसिद्ध करते आणि ते पुस्तिकेच्या स्वरूपात रसिकांना वितरित केले जाते. महामंडळाचे प्रमुख कार्यवाह हे या भाषणाच्या पुस्तिकेचे मुद्रक-प्रकाशक असतात. मात्र, यंदा अध्यक्षीय भाषणाला उशीर झाल्यामुळे आणि त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे महामंडळाच्या बैठकीमध्ये हे भाषण प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सबनीस यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेली भाषणे हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.
पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर टीका करून श्रीपाल सबनीस यांनी साहित्य संमेलनाच्या तोंडावर वादळ निर्माण केले. पंतप्रधानांची माफी मागितल्याखेरीज सबनीस यांना संमेलनामध्ये पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेत खासदार अमर साबळे यांनी आंदोलन केले होते. संमेलनाच्या दोन दिवस आधी सबनीस यांनी या प्रकाराबद्दल पंतप्रधानांची दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर मराठी भाषेच्या उत्सवासाठी आडकाठी आणली जाणार नाही, असे सांगून साबळे यांनी या वादावर पडदा टाकला. मात्र, अध्यक्षीय भाषणामध्ये वादग्रस्त विधाने करून आणखी वाद निर्माण करू नये, असा इशाराही सबनीस यांना देण्यात आला होता. या साऱ्या घडामोडींमुळे सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी शुक्रवारी (१५ जानेवारी) दुपारी दोन वाजता निघणार होती. त्याचदिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या भाषणाची प्रत मिळाली. महामंडळाच्या प्रथेनुसार पदाधिकारी हे भाषण वाचल्यानंतरच ते छपाई करण्यासाठी दिले जाते. संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण सुरू होताना त्याची मुद्रित प्रत साहित्य रसिकांच्या हाती दिली जाते. मात्र, तेवढा अवधी उरला नसल्याने आणि या लिखित भाषणामध्ये काही विधानांवरून वाद होण्याची शक्यता ध्यानात घेता साहित्य महामंडळाने ते छपाईसाठी देऊ नये, असा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या सबनीस यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकत्यार्ंमार्फत रात्रीतून हे भाषण स्वखर्चाने छापून त्याच्या प्रती वितरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या भाषणाबाबतची जबाबदारी महामंडळाने झटकली असल्याने वाङ्मयीन संवाद साधू पाहणारे सबनीस एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.
पवारांनी पाहिले अखेरचे पृष्ठ
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर श्रीपाल सबनीस यांनी अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाती सुपूर्द केली. पवार यांनी या भाषणाच्या पुस्तिकेचे अखेरचे पृष्ठ पाहिले. हे भाषण साहित्य महामंडळाने प्रकाशित केले नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले. यासंदर्भात विचारणा केली असता अध्यक्षीय भाषण न छापल्याबद्दल मी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतो, असे सबनीस यांनी पवार यांना सांगितले, अशी माहिती महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. समारोप सत्रात संमेलन यशस्वी केल्याबद्दल सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, भाग्यश्री पाटील आणि समन्वयक सचिन इटकर यांचा सबनीस यांनी स्वखर्चाने आणलेली शाल पांघरून सत्कार केला. मात्र, महामंडळ पदाधिकारी या सत्कारापासून वंचित राहिले.