पिंपरी-चिंचवड शहरातील ‘बीआरटी’ रस्ते सुरू होणार असल्याची घोषणा पिंपरी महापालिकेने सातत्याने केली. मात्र, त्यानुसार कृती होत नव्हती. अखेर, महापालिकेला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त लाभला आहे. शनिवारी १५ ऑगस्टला सांगवी ते किवळे या १५ किलोमीटर अंतराच्या बीआरटी रस्त्याचे उद्घाटन समारंभपूर्वक होणार आहे.
शहरात चार बीआरटी रस्ते आहेत, त्याचे अंतर ४५ किलोमीटर आहे. त्यापैकी सांगवी ते किवळे या महामार्गावरून जाणारा प्रमुख बीआरटी रस्ता तयार झाला आहे. १४. ५ किलोमीटरच्या या रस्त्यावर २१ बस स्टेशन आहेत. शनिवारी उद्घाटन होणार असल्याने आयुक्त राजीव जाधव, सहशहर अभियंता राजन पाटील यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी नगरसेवक प्रशांत शितोळे तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तयारीचा शेवटचा हात फिरवण्यात आला.
शहरातील बीआरटी मार्गाना प्रारंभ होणार असल्याची घोषणा वारंवार झाली. त्यादृष्टीने अपेक्षित कार्यवाही झाली नाही. अगदी अलीकडे एक ऑगस्टपासून हे मार्ग सुरू करण्याचे पालिकेने जाहीर केले होते. मात्र, तेही शक्य झाले नाही. अखेर, १५ ऑगस्टला पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी पालिकेने केली. दुसरीकडे, बीआरटी मार्गामुळे वाहतुकीची कोंडी होईल आणि हे मार्ग सुरक्षित नाहीत, अपघात वाढतील, असे विविध मुद्दे उपस्थित करत बीआरटीला विरोधही होत आहे. बीआरटी रद्द करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलनेही झाली आहेत. या पाश्र्वभूमीवर, बीआरटीचा विषय पुन्हा ऐरणीवर येणार आहे.

Story img Loader