राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत २०१३ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी पालिकेच्या ‘सारथी’ उपक्रमास १० लाखांचे बक्षीस मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त राजीव जाधव यांनी मुंबईत त्याचा स्वीकार केला. यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आणि राज्यभरात कौतुक झालेल्या ‘सारथी’चे महत्त्व त्यांच्या बदलीनंतर जाणीवपूर्वक कमी करण्यात आले. आजमितीला ‘सारथी’ केवळ कागदोपत्री उरल्याचे दिसून येते.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०१३ मध्ये ‘सारथी’चे उद्घाटन करण्यात आले. त्या माध्यमातून मिळणारी माहिती व केलेल्या तक्रारींचे जलदगतीने होणारे निवारण यामुळे अल्पावधीत ‘सारथी’ उपक्रम लोकप्रिय ठरला होता. नागरिक ‘सारथी’वर संपर्क साधून आपल्या तक्रारी मांडू लागल्यामुळे व त्याची सोडवणूक होऊ लागल्याने नगरसेवकांचे महत्त्व कमी झाले होते, त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्या विरोधात रान उठवले होते. मात्र, त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन परदेशींनी ‘सारथी’वर लक्ष केंद्रित केले आणि प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे राज्यभरात ‘सारथी’चे कौतुक झाले, याची दखल शासनानेही घेतल्याने पालिकेला १० लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते आयुक्त जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संगणक अधिकारी नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. या वेळी खडसे तसेच मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांनी परदेशींचे तसेच पिंपरी पालिकेचे भरभरून कौतुक केले.
अनधिकृत बांधकामाच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे परदेशी यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्याच गरमागरमीत अजितदादांनी परदेशींची बदली केली. त्यानंतर, ‘सारथी’चे महत्त्व कमी-कमी होत गेले. परदेशी यांच्या काळात ‘सारथी’वरील तक्रारींचे निवारण करण्यात अधिकारी तत्परता दाखवत होते. त्यांच्या पश्चात तितकेच दुर्लक्ष झाले. सद्य:स्थितीत, ‘सारथी’चे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे. मात्र, या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने १० लाखांचे बक्षीस दिले आणि ज्यांच्या काळात ‘सारथी’ची अधोगती झाली, त्याच आयुक्तांनी बक्षीस स्वीकारले.

Story img Loader