पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गायकवाड गुरुवारी निवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागेसाठी पुन्हा नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. गेल्या काही महिन्यांत या पदासाठी पूर्ण वेळ अधिकारीच मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
पिंपरी पालिकेत मुख्य आरोग्य वैद्यकीय आरोग्यपदावरून डॉ. नागकुमार कुणचगी व डॉ. राजशेखर अय्यर यांच्यात बरीच रस्सीखेच होती, त्यावरून झालेल्या नाटय़मय घडामोडीनंतर डॉ. कुणचगी यांची वर्णी लागली. तेव्हा त्यांच्याइतक्याच ज्येष्ठ असलेल्या डॉ. अय्यर यांच्यासाठी वैद्यकीय संचालकपद निर्माण करण्यात आले. पुढे, डॉ. कुणचगी निवृत्त झाले व त्यांच्या जागी डॉ. अय्यर यांना काम करण्याची संधी मिळाली. थोडय़ाच कालावधीत डॉ. अय्यरही निवृत्त झाले. तेव्हा अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना संधी मिळेल, असे सर्वानाच वाटत होते. प्रत्यक्षात, डॉ. आनंद जगदाळे यांनी ‘नाही-नाही’ म्हणत ती खुर्ची मिळवली. जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळालेले डॉ. जगदाळे वादाच्या भोवऱ्यात अडकले व त्यातच निवृत्त झाले. तेव्हा वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. श्याम गायकवाड यांनी अनिच्छेने जबाबदारी स्वीकारली. गुरुवारी ते निवृत्त झाले आणि पुन्हा एकदा या पदासाठी ‘सक्षम’ अधिकाऱ्याचा शोध सुरू झाला.

Story img Loader