प्लास्टिक हाताळणी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी पालिकेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्त राजीव जाधव यांना बजावलेल्या नोटीसीला उत्तर देताना, शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असल्यासह अनेक दावे आयुक्तांनी केले आहेत. ही आयुक्तांची फेकाफेकी असल्याचा आरोप करत याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचा इशारा सावळे यांनी दिला आहे.
प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासल्याचा आरोप करून सावळे यांनी आयुक्तांना नोटीस बजावली होती, त्याला उत्तर देताना आयुक्तांनी ‘कागदी घोडे’ नाचवले आहेत, असा आक्षेप सावळे यांनी घेतला आहे. कुठेही सहज उपलब्ध होत असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. दुर्गादेवी उद्यानात प्लास्टिक वस्तू नेण्यास बंदी असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. मात्र, ही बंदी कागदोपत्रीच आहे. मोशी कचरा डेपोत प्लास्टिकच्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जात असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात केवळ एक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, याकडे सावळे यांनी लक्ष वेधले आहे. आयुक्तांच्या कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामुळे शहरातील पर्यावरणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत सावळे यांनी हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
प्लास्टिक वापर बंदीवरून पिंपरी आयुक्तांचे ‘कागदी घोडे’
प्लास्टिक हाताळणी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी पालिकेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी याप्रकरणी हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.
First published on: 24-11-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seema savale warns regarding ban on use of plastic bags