माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. भोसरीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पाठबळावर महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांचा पराभव केला. ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना पराभवाचा धक्का दिला. तर, लोकसभेत दारूण पराभूत झालेल्या लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून ६१ हजारांच्या मताधिक्याने विजयी होऊन आमदारकीची हॅट्ट्रिक केली आहे. तीनही मतदारसंघांतील निकालाने राष्ट्रवादीच्या किल्ल्याला भगदाड पडले असून आगामी काळातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असल्याचे स्पष्ट संकेतही यातून मिळाले आहेत.

मतदारसंघ : पिंपरी

 

काँग्रेसचा नगरसेवक बनला शिवसेनेचा आमदार19CHABUKSWAR
– निष्क्रीयता, गटबाजी, अति आत्मविश्वासाचा आमदार बनसोडे यांना फटका

पक्षांतर्गत विरोध, तीव्र गटबाजी, आमदार म्हणून पाच वर्षांतील निष्क्रीयता आणि अति आत्मविश्वासामुळेच राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना बालेकिल्ल्यातच पराभव पत्करावा लागला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी काँग्रेसकडील नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेची उमेदवारी स्वीकारलेल्या गौतम चाबुकस्वार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. बनसोडे यांच्या पक्षांतर्गत विरोधी फौजेने शिवसेनेला रसद पुरवल्याचे उघडपणे दिसून आले.
अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार बनसोडे, शिवसेनेचे चाबुकस्वार, भाजप-मित्र पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यात प्रमुख लढत होती. त्यात तिंरगी लढतीत चाबुकस्वारांनी अडीच हजाराच्या फरकाने बाजी मारली. मतदारांची तीव्र नाराजी तसेच पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका आमदारांना बसला. नागरिकांना उपलब्ध न होणे, ठराविक टोळक्यातच राहणे, गणेश मंडळांना वेठीस धरणे, पिंपरीतील एकाच परिवाराच्या आहारी जाणे आणि मीच निवडून येणार, हा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला. शेवटच्या टप्प्यातील आवश्यक खबरदारी घेतली नाही म्हणून त्यांचा घात झाला. राष्ट्रवादीतील एक प्रभावी गट व काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेला बनसोडे विरोधी नेता, यांनी ठरवून बनसोडेंचा राजकीय ‘गेम’ केला, त्यासाठी शिवसेनेचा खांदा वापरला. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या चाबुकस्वारांना शिवसेनेत आणून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेस-शिवसेनेची एकत्रित ताकद चाबुकस्वारांना मिळाली. महायुतीच्या जागावाटपात मूळ भाजपकडे असलेली िपपरीची जागा ऐनवेळी रिपाइंला मिळाली. मात्र, सोनकांबळेंना भाजपच्या हक्काच्या मतदारांनी पूर्णपणे स्वीकारले नाही. ‘कमळ’ नसल्याने त्यांनी ‘धनुष्यबाणा’चा पर्याय निवडला. मोदींच्या िपपरीतील सभेमुळे सोनकांबळेंना फायदा झाला. मात्र, विजयापर्यंत जाऊ शकल्या नाहीत. िपपरीत काँग्रेसचे हक्काचे मतदान असूनही ते मतपेटीत पडले नाही. काँग्रेसचा एकही नेता प्रचारासाठी फिरकला नाही. मनोज कांबळे ही निवडणूक का लढले, असा प्रश्न अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला होता

एकूण मतदान- १,७२,४६७
अॅड. चाबुकस्वार गौतम सुखदेव (शिवसेना)- ५१०९६
अण्णा दादु बनसोडे (राष्ट्रवादी) – ४८७६१
सोनकांबले चंद्रकांत लक्ष्मण (आरपीआय-ए) ४७२८८
मनोज विष्णू कांबळे (काँग्रेस)- ११०२२
अनिता दत्तात्रय सोनवणे (मनसे)- ५१६९
नकाराधिकार (नोटा)- ४४३५
…………..

 

चिंचवडला लक्ष्मण जगताप यांची ‘हॅट्ट्रिक’19jagtap
– लोकसभेला मोदींनी मारले, आता मोदींनीच तारले

लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेमुळे दारूण पराभूत झालेल्या लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेला सामोरे जाताना स्वत:च्या बऱ्याच चुका सुधारल्या. शरद पवार तसेच अजित पवार यांच्याशी वर्षांनुवर्षे असलेली नाळ तोडून राष्ट्रवादीशी ‘अधिकृत’पणे काडीमोड घेतला आणि मोक्याच्या क्षणी भाजपची उमेदवारी स्वीकारली. त्याचा पुरेपूर फायदा झाल्याने तब्बल ६१ हजार मताधिक्याने ते निवडून आले आणि आमदारकीची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली.
पाच लाखांच्या घरात मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात भाजपचे जगताप, शिवसेनेचे राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नाना काटे, काँग्रेसचे कैलास कदम, मनसेचे अनंत कोऱ्हाळे व अपक्ष मोरेश्वर भोंडवे असे सहा जण मुख्य लढतीत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जगतापांच्या पराभवासाठी प्रतिष्ठा पणाला लावली, सर्व डावपेच आखले. मात्र, जगतापांनी एकतर्फी विजय मिळवला. लोकसभेतील मोदी लाटेत इतरांप्रमाणेच जगतापांची दाणादाण उडाली. राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी सावध पाऊले टाकली. सत्ता असूनही महत्त्वाचे प्रश्न न सोडवल्याने अजितदादांचा आग्रह असतानाही त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. महायुती तुटल्यानंतर तत्परतेने भाजपमध्ये उडी घेतली. भाजपनेही त्यांची ताकद ओळखून उमेदवारी बहाल केली.
स्वत:ची ताकद, भाजपची पारंपरिक मते, राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची त्यांच्यासाठी राबणारी फौज आणि तुलेनेने नवखे प्रतिस्पर्धी असल्याने सोप्या लढतीत त्यांचा विजयी मार्ग सुकर झाला. जगतापांनी कोलांटउडी घेतली, तेव्हा राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता, त्याचवेळी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी काटे, भोंडवे, कलाटे आणि भाऊसाहेब भोईर अशी भलतीच स्पर्धा होती. काटेंसाठी अनेकांनी वजन खर्ची केले. मात्र, कलाटेंनी उमेदवारी खेचून आणली. सेनेने डावललेल्या काटेंना अजितदादांनी राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. मात्र, सर्व समीकरणे जुळून आल्याने जगताप मोठय़ा मताधिक्याने निवडून आले आणि भाजपचे प्राबल्य असलेल्या चिंचवडमधून प्रथमच कमळ फुलले. काँग्रेसला गेल्या वेळचा २४ हजार मतांचा आकडाही गाठता आला नाही. राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणा भाजपच्या दावणीला लावून जगतापांनी राष्ट्रवादी खिळखिळी आणि सेनेने लोकसभेत केलेल्या पराभवाची विधानसभेत परतफेड केली.

मतदारसंघ : भोसरी

 
पै-पाहुण्यांच्या भोसरीत महेश लांडगे यांचा ‘दे धक्का’3landge
– भाचेजावयाची आमदार सासऱ्यावर मात

भोसरीत आमदार सासऱ्याविरूध्द लढलेला बंडखोर भाचेजावई, या बहुचर्चित लढतीत जावयाने सासऱ्यावर मात केली. पै-पाहुण्यांच्या भोसरीत आमदार विलास लांडे यांना पराभूत करून नगरसेवक महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले आणि अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांनाही धूळ चारून भोसरीत अपक्ष आमदाराची परंपरा कायम ठेवली.
विलास लांडे व महेश लांडगे यांच्यातील नातीगोती व सत्तासंघर्षांमुळे भोसरीच्या लढतीकडे जिल्ह्य़ाचे लक्ष होते. गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झालेल्या शिवसेनेच्या सुलभा उबाळे पुन्हा िरगणात होत्या. तर, त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी एकनाथ पवार भाजपचे उमेदवार होते. काँग्रेसचे हनुमंत भोसले व मनसेचे सचिन चिखले असे सहाजण लढतीत होते. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या या लढतीत कोण निवडून येईल, याची शाश्वती नव्हती. अखेर, लांडगे यांची १५ हजाराने सरशी झाली. आमदार लांडे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले तर उबाळे पुन्हा दुसऱ्या स्थानावर राहिल्या. भाजपच्या पवारांनी लक्षणीय मते घेतली.
लांडे गेल्यावेळी अपक्ष निवडून आले होते. यंदाही ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते. मात्र, अजित पवारांनी तगादा लावून त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीविषयी असलेल्या नकारात्मक वातावरणातही त्यांनी मोठे आव्हान उभे केले. लांडेंचे भोसरीतील तसेच पक्षांतर्गत विरोधक लांडगे यांच्या पाठीशी होते. शिवसेनेचा व मनसेचा शहरप्रमुख, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवकांचे खुले समर्थन त्यांना मिळाले. तसेच माजी नगरसेवकांची फौज लांडगे यांच्या ताफ्यात होती. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे व अजितदादांचे पाठबळ लांडे यांच्यामागे होते. दोहोंमधील सत्तासंघर्ष उबाळे यांच्या पथ्यावर होता. मागील पराभवामुळे सहानुभूतीही होती. मात्र त्या विजय गाठू शकल्या नाहीत. पक्षातील मतांची फाटाफूट व भाजपशी तुटलेली युती मारक ठरली. पवार, उबाळे व चिखले हे निगडी परिसरातील उमेदवार होते, त्यामुळे तेथील मतांची विभागणी अटळ होती. गेल्या विधानसभेला लांडे यांना हनुमंत भोसले यांच्या मदतीचा हात निर्णायक ठरला होता. मात्र, यंदा भोसले स्वत: रिंगणात होते.