सामान्य कुटुंबात जन्माला आलेली, हलाखीच्या परिस्थितीमुळे शेतमजुरीसह मिळेल ते काम करणारी, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारी महिला कार्यकर्ती राजकारणात उतरते आणि अवघ्या सात वर्षांच्या काळात महापौरपदासारख्या मानाच्या पदावर विराजमान होते.. िपपरी-चिंचवडच्या नव्या महापौर शकुंतला धराडे यांचा हा प्रवास आहे.
मावळत्या महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शकुंतला धराडे यांची महापौरपदी, तर प्रभाकर वाघेरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर सर्वपक्षीय सदस्यांची अभिनंदनपर भाषणे झाली. बहुतांश सदस्यांनी धराडे यांचा कष्टप्रद प्रवास व बलवत्तर नशिबाचा संदर्भ दिला. तेव्हा सत्काराला उत्तर देताना धराडे यांनी पक्षप्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह पक्षातील नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आरक्षण मिळाले, त्यातूनच ही संधी मिळाली. नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर येथे सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. आम्ही तीन बहिणी, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची. मात्र, वडिलांनी काहीही कमी पडू दिले नाही. भाऊसाहेब धराडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर िपपळे गुरव येथे आले. आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना शेतमजुरीही केली. लक्ष्मण जगताप यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गटाचे काम जोमात सुरू होते, त्यात सहभागी झाले. महिलांसाठी केलेल्या कामाची दखल जगतापांनी घेतली. २००७ मध्ये त्यांनी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवून दिली व निवडूनही आणले. २०१२ मध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित प्रभागातून जगताप यांनी बिनविरोध निवडून आणले आणि आता महापौरपदी बसवले. मी महापौर होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पती भक्कमपणे पाठीशी राहिले. त्यांच्या पाठबळाशिवाय येथपर्यंत येणे शक्य नव्हते,’’ अशा भावना नव्या महापौरांनी व्यक्त केल्या.
सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलींनी शिक्षण घ्यावे, यासाठी विशेष मोहीम राबवण्यास माझा प्राधान्यक्रम राहील. झोपडपट्टीतील नागरिकांसाठी शौचालये उभारणे, शहरवासीयांसाठी पुरेसा पाणीपुरवठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी व शास्तीकर रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
महापौर शकुंतला धराडे
सुनियोजित विकासासाठी मी कटिबध्द आहे. िपपरी डेअरी फार्म येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे सर्वाधिक लक्ष देणार आहे.
उपमहापौर प्रभाकर वाघेरे