चिंचवड विधानसभा मतदारसंघ

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची हक्काची मतपेढी असलेला मात्र तरीही दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जाणारा चिंचवड मतदारसंघ बदलत्या राजकीय परिस्थितीत संवेदनशील बनला आहे. एके काळी जवळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे व नंतरच्या काळात परस्परांचे हाडवैरी बनलेले शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात महापालिका निवडणुकीत वर्चस्वाची लढाई आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे व शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांचे कार्यक्षेत्र याच पट्टय़ात असून ते महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांचे राजकीय भवितव्यही ठरणार आहे.

सांगवी-औंध उरो रुग्णालयापासून सुरू झालेला चिंचवड विधानसभा मतदारसंघ किवळे, पुनावळ्यापर्यंत पसरला आहे. पालिकेचे ५२ नगरसेवक या भागातून निवडून येणार आहेत. चिंचवड मतदारसंघाचा काही भाग पूर्वी मुळशी मतदारसंघात तर, काही ‘हवेली’त होता. पिंपरी पालिकेचा अनेक वर्षे कारभार पाहिलेल्या नानासाहेब शितोळे यांचे सांगवी हे कार्यक्षेत्र होते. बारणे व जगताप एके काळी शितोळे यांचेच अनुयायी होते. सुरुवातीची काही वर्षे गुण्यागोविंदाने एकत्रित काम करणाऱ्या बारणे-जगताप यांच्यात राजकीय महत्त्वाकांक्षेतून वादंग सुरू झाले. अनेकांनी खतपाणी घातल्याने पुढे ते फारच विकोपाला गेले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते समोरासमोर लढले, तेव्हा जगतापांनी बारणे यांचा पराभव केला. २०१४ च्या लोकसभेत बारणे यांनी त्या पराभवाची परतफेड केली. याच वर्षांत बारणे खासदार झाले तर जगताप आमदार झाले. दोघांमधील धुसफूस कायम पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवली आहे. आता त्यांच्यात महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्वाची लढाई लागली आहे. ५२ जागा असल्याने सर्वच पक्षांनी चिंचवड मतदारसंघाकडे अधिक लक्ष दिले आहे. खरी लढत भाजप-शिवसेनेत होणार आहे. पिंपळे गुरव, सांगवी भागात जगतापांचे वर्चस्व आहे. तर, थेरगावांत बारणे यांचा प्रभाव आहे. चिंचवड पट्टय़ात भाजपला मानणारा वर्ग आहे, तसाच तो शिवसेनेला मानणाराही आहे. लोकसभेत बारणे यांना या भागातून ‘धो-धो’ मते पडली. तेच चित्र विधानसभेत जगताप यांच्याबाबतीत दिसून आले. आता पालिका निवडणुकीत ही मते कोणाकडे वळणार, हा कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादीची ठरावीक अशी ताकद मतदारसंघात आहे. हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, नाना काटे अशी नेतृत्वाची फळी आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या प्रवेशाने आणखी भर पडली आहे.

भाजपला पिंपरी पालिकेची सत्ता हस्तगत करायची आहे, त्यांची पूर्ण मदार चिंचवड मतदारसंघावर आहे. जितके जास्त नगरसेवक या भागातून निवडून येतील, त्यावरच भाजपच्या सत्तेचा दावा अवलंबून राहणार आहे. मात्र, भाजपसमोर शिवसेनेचेच आव्हान आहे. तीनही मतदारसंघांत सेनेचे जास्त नगरसेवक चिंचवड मतदारसंघातून निवडून येणार आहेत. दोन्ही पक्षात युती होण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा राष्ट्रवादीचे धाबे दणाणले होते. कारण, युती झालीच असती तर या इतर पक्षांचे नामोनिशाण राहिले नसते. बारणे-जगतापांना युती व्हावी असे वाटत नव्हते. त्या दृष्टीने त्यांची व्यूहरचना होती.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा काडीमोड जाहीर केला. तरीही स्थानिक पातळीवरील वादामुळे युती होण्याची शक्यता धूसरच झाली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे व शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे हे महापालिका रिंगणात उतरले आहेत. साठे पिंपळे निलखमधून तर कलाटे वाकडमधून रिंगणात उतरणार आहेत. दोघांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निवडणूक महत्त्वाची आहे. साठे यांची वर्षांनुवर्षांची ‘भाऊबंदकी’ यंदा मिटली आहे. तर कलाटे यांना भावकीशीच लढावे लागणार आहे. जगताप भाजपमध्ये येईपर्यंत पक्षाची ताकद अतिशय मर्यादित होती. मात्र, आता चहुबाजूने भाजपचे बळ वाढले आहे. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले असून अजूनही प्रवेशाची रांग सुरूच आहे. जेमतेम तीन आठवडय़ांवर निवडणुका असल्याने ‘कोण कितने पानी में’ हे लवकरच स्पष्ट होईल.

चित्र असे आहे..

*विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप (भाजप)

* निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ५२

* राष्ट्रवादीला गळती; भाजपची ताकद वाढली

* काँग्रेस, शिवसेनेचे शहराध्यक्षही रिंगणात

Story img Loader