पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याकडे मुख्यमंत्री चालढकल करत आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले, त्यांच्या समर्थनार्थ पिंपरीतील ४० नगरसेवकांनीही राजीनामे दिले. तथापि, त्या नगरसेवकांची नावे राष्ट्रवादीने जाहीर केलीच नाहीत. नेमकी हीच बाब हेरून शिवसेनेने गुरुवारी राष्ट्रवादीला खिंडीत गाठले. त्या ४० नगरसेवकांची नावे जाहीर करावीत म्हणून महापौर कार्यालयात सेनेने गोंधळ घातला.
गुरुवारी पालिका सभेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली. आमदारांच्या समर्थनार्थ कोणत्या नगरसेवकांनी राजीनामे दिले, याची माहिती द्यावी, असे निवेदन बारणे यांनी महापौरांना दिले. तेव्हा महापौरांसमवेत राष्ट्रवादीच्या काही नगरसेविका होत्या. सेना नगरसेवकांनी त्या नावांची यादी देण्यासाठी आग्रह धरला. तेव्हा प्रशांत शितोळे यांच्याकडे ती यादी आहे, उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला देऊ, असे सांगून महापौरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आताच नावे जाहीर करा, असे सेना नगरसेवक म्हणत होते. यातून वादावादी सुरू झाली. महापौरांना कोंडीत पकडल्यानंतर अजित गव्हाणे व राष्ट्रवादीचे काही नगरसेवक तिथे आले. त्यांनी शनिवारी ही नावे जाहीर करू, असे सांगितले तेव्हा प्रकरण निवळले.
यासंदर्भात बारणे म्हणाले, राष्ट्रवादीकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. नागपूर अधिवेशनात बांधकामे नियमित करण्याचे विधेयक मांडणार, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात, ते विधेयक मांडण्यात आले नाही. नगरसेवकांनी राजीनामे दिले असे ते सांगतात. मात्र, नावे जाहीर करत नाही, यातून त्यांचा दुतोंडीपणा दिसून येतो.

Story img Loader