मायबोली विकास मंचच्या वतीने २२ ते २८ डिसेंबर दरम्यान पिंपरीतील एचए कंपनीच्या मैदानावर ‘शिवपुत्र शंभुराजे’ महानाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी यांची भूमिका अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, तर औरंगजेबाची भूमिका रवी पटवर्धन साकारणार आहेत. या महानाटय़ातून मुळशीतील गोशाळेच्या उभारणीसाठी मदत केली जाणार आहे.
महानाटय़ाचे दिग्दर्शक महेंद्र महाडिक व मंचचे संस्थापक दिलीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा नाटय़प्रयोग होणार आहे. संभाजी महाराजांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीची मांडणी या महानाटय़ाद्वारे केली जाणार आहे. उंट, हत्ती, घोडे तसेच २५० कलाकारांचा समावेश असलेल्या महानाटय़ात महाराष्ट्राच्या मातीतील लोककला व नवरसांचा वापर करण्यात आला आहे. फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक ध्वनी व प्रकाशयोजना हे वैशिष्टय़ राहणार आहे. या महानाटय़ातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मुळशी तालुक्यातील नेरे गावी ‘मायबोली गोशाळा’ ची उभारणी करण्यात येणार आहे. गोवंश वाढवणे व जतन करणे यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.

Story img Loader