पिंपरी प्राधिकरण व महापालिका यांच्याकडून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. शहराच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या बांधकामांच्या कारवाईवरून सत्तारूढ राष्ट्रवादी व शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत.
महापालिका व प्राधिकरणाच्या वतीने अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई एकतर्फी स्वरूपाची असून ज्यांना कुणी वाली नाही तसेच विरोधकांशी संबंधित अशीच बांधकामे पाडण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन बाबर व गटनेते श्रीरंग बारणे यांनी नुकताच केला होता. राज्यशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी िपपरी ते मुंबई पायी मोर्चा काढण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. याशिवाय, पाडापाडी कारवाईच्या निषेधार्थ काळेवाडी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, वाकड या ठिकाणी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी अनेक निवडणुका लढवल्या. खोटी आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक करून त्याजिंकल्या. आठवडय़ात अध्यादेश काढू, अशी घोषणा करून मुख्यमंत्रीही त्यात सहभागी झाले, याकडे शिवसेनेकडून लक्ष वेधले जात आहे. तर, याबाबतचा निर्णय निश्चितपणे होणार असल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. तूर्त या विषयावरून राष्ट्रवादीची कोंडी करण्याची संधी शिवसेनेने साधल्याचे दिसून येते.
अनधिकृत बांधकामांवरून शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’
पिंपरी प्राधिकरण व महापालिका यांच्याकडून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.
First published on: 20-07-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aggressive on action against unauthorised constructions