समर्थ रामदासस्वामींचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांचे सापडलेले दुर्मिळ ऐतिहासिक चित्र.. या चित्राचा आधार घेत लेखनप्रक्रिया सुरू असलेल्या कल्याणस्वामींचे चित्र रेखाटण्याची किमया साधली प्रसिद्ध चित्रकार गोपाळ नांदुरकर यांनी.. डोमगाव (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) येथे असलेल्या कल्याणस्वामी समाधी मंदिरामध्ये समर्थवंशज भूषणस्वामी यांच्या हस्ते नुकतेच या चित्राचे अनावरण करण्यात आले.
थोर समर्थभक्त आणि संशोधक शंकरराव देव यांना डोमगाव येथील मठात कल्याणस्वामींचे ऐतिहासिक चित्र मिळाले होते. त्यामध्ये प्राणायाम करताना कल्याणस्वामी योगमुद्रेत दाखविले आहेत. या चित्राचा आधार घेत गोपाळ नांदुरकर यांनी हे चित्र साकारले आहे. यामध्ये कल्याणस्वामी यांची लेखनप्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या उजव्या हातामध्ये बोरू तर डाव्या हातामध्ये कोरा कागद आहे. चौरंगावर शाईची दौत असून बाजूला लिहून ठेवलेली पोथीची पाने दिसतात. लेखनप्रक्रियेमध्ये क्षणभराचा विसावा (पॉझ) घेऊन कल्याणस्वामी गुरुस्मरणात रमले आहेत. पाश्र्वभूमीला श्री समर्थ ज्ञानमुद्रेद्वारे त्यांना आशीर्वाद देत आहेत. ज्ञान, भक्ती आणि वैराग्याच्या प्रकाशाने हे चित्र उजळून निघाले असल्याचे चित्रकार गोपाळ नांदुरकर यांनी सांगितले.
कल्याणस्वामींना प्राधान्य असणारे चित्र आजवर उपलब्ध नव्हते. कल्याणस्वामी यांच्या तीनशेव्या पुण्यतिथीनिमित्ताने ते चितारण्याची प्रेरणा नांदुरकर यांना झाली. या चित्र संकल्पनेला पूर्णता देण्यासाठी समर्थव्रती सुनील चिंचोलकर, मंदारबुवा रामदासी, सचिन जहागीरदार यांचे मार्गदर्शन आणि आचार्य किशोरजी व्यास ऊर्फ स्वामी गोविंददेव गिरी यांचे आशीर्वाद लाभले. हे मूळ चित्र नांदुरकर यांनी डोमगाव येथील मठास अर्पण केले असून सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानतर्फे प्रकाशित होणाऱ्या रघुवीर समर्थ मासिकाच्या श्री कल्याणस्वामी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे.