वीजबिल घरापर्यंत येईपर्यंत बिलाची रक्कम व तपशील न कळण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहेत. महावितरण कंपनीकडून पुणे विभागामध्ये नव्या तंत्राचा वापर करून वीजबिलाची माहिती पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्राहकांना वीजबिलाची माहिती मोबाइलच्या माध्यमातून ‘एसएमएस’वर पाठविली जात आहे. त्याचप्रमाणे ई-मेलद्वारे वीजबिलही पाठविण्यात येत आहे. त्यासाठी ग्राहकाला त्याचा मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत महावितरणच्या ग्राहक सेवा केंद्रात साडेसहा लाखांहून अधिक ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
महावितरण कंपनीकडून विविध ग्राहकसेवांसह वीजग्राहकांच्या मोबाइलवर मासिक वीजबिलाची माहिती प्रायोगित तत्त्वावर एसएमएसद्वारे पाठविणे सुरू करण्यात आले आहे. पुणे परिमंडलात मोबाइलची नोंदणी केलेल्या सर्वच ग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठविण्यात येतो. त्याशिवाय ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्यात येत आहे. महावितरणच्या ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे व िपपरी- चिंचवड शहरासह पुणे परिमंडलातील सहा लाख ५९ हजार १३३ वीजग्राहकांनी स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात केली आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल ६० हजार ९०५ ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली.
संपर्क क्रमांक नोंदविणाऱ्यांमध्ये पुणे परिमंडलात िपपरी विभागातील ग्राहक आघाडीवर आहेत. पिंपरी विभागात सर्वाधिक ९९ हजार ८९ ग्राहकांनी संपर्क क्रमांक नोंदविले आहेत. इतर विभागात कोथरूड ७९,५८८, भोसरी ५१,८४९, बंडगार्डन ८५,३०५, शिवाजीनगर ५३,८५७, नगर रस्ता ५६,९२३, पद्मावती ६०,४५९, पर्वती ७३,९९३, रास्ता पेठ ५१,८२२, तर मंचर, मुळशी व राजगुरूनगर विभागात ४६,२४८ वीजग्राहकांनी स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.

संपर्क क्रमांक नोंदणीसाठी विविध पर्याय

संपर्क क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय देण्यात आले आहेत. महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस करून ग्राहकाला स्वत:चा ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंद करता येते. या क्रमांकावर बारा अंकी ग्राहक क्रमांक व वीजग्राहकाचा ई-मेल आयडी टाईप करून एसएमएस केल्यास त्याची नोंद होईल. त्याचप्रमाणे नोंदणी करायच्या मोबाइलवरून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर बारा अंकी ग्राहक क्रमांक एसएमएस केल्यास मोबाइल क्रमांकाची नोंद होईल. याशिवाय महावितरणच्या चोवीस तास सुरू असलेल्या कॉल सेंटरचे १८००२००३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहेत. मोबाइल किंवा दूरध्वनीद्वारे या क्रमांकावर संपर्क साधता येतो. भाषेची निवड करून सहा अंक दाबल्यास ग्राहक प्रतिनिधीशी संपर्क करता येतो. प्रतिनिधीला वीजग्राहक क्रमांकासह स्वत:चा मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांक सांगितल्यास त्याची नोंद केली जाते. महावितरणच्या www.mahadiscom.in   या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अॅपवर ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना संपर्क क्रमांक नोंदविण्याची सुविधा आहे.

Story img Loader