‘सॅमटेक’ कंपनीचा पुढाकार; पालिकेकडून वीज, पाणी व जागेची उपलब्धता

पिंपरी-चिंचवड शहरात पाच ठिकाणी ‘अ‍ॅटोमॅटिक पब्लिक टॉयलेट’ बसवण्यात येणार आहेत, यासाठी ‘सॅमटेक क्लिन अ‍ॅन्ड केअर’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

सर्वसोयींयुक्त तसेच महिला व पुरूष असे दोघांनाही वापरता येतील, अशा प्रकारची ही स्वच्छतागृहे कंपनीकडून स्वखर्चाने उभारण्यात येणार आहेत. पालिकेच्या वतीने जागा, वीज, पाणी व सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सॅमटेकच्या धर्तीवर शहरातील अन्य कंपन्यांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

निगडी येथील बसथांबा, थेरगाव येथील डांगे चौक, पिंपळे सौदागर, नाशिकफाटा आणि चिंचवड स्टेशन येथे ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. ही पाचही ठिकाणे अत्यंत गर्दीच्या जागा म्हणून ओळखल्या जातात. या ठिकाणी अतिशय नाममात्र दरात (प्रत्येकी पाच रूपये) ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपनीकडून स्वखर्चाने ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत, त्यात भरपूर सुविधा असतील, असे कंपनीने सांगितले. ही स्वच्छतागृहे स्टीलची राहणार असून वॉश बेसिन, अ‍ॅल्युमिनियम फ्लोरिंग, अ‍ॅटो क्लीनिंग आणि टॉयलेट सीट, इनबिल्ट वॉटर टँक राहणार आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीनची सोय असणार आहे.  यासाठी पुढील सात वर्षांंचा खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे, त्यामध्ये देखभाल दुरूस्तीसह इतर खर्चाचा समावेश आहे. जाहिरातीसह काही हक्क कंपनीला दिले जाणार आहेत.

सोमवारी (२५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता या उपक्रमातील पहिल्या स्वच्छतागृहाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी खासदार दिलीप गांधी, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सॅमटेक कंपनीचे संचालक शोबित गुप्ता व अमित बाली उपस्थित राहणार आहेत. इतर ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी जागांचे प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयांकडून मागवण्यात आले आहेत, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

सामाजिक बांधीलकी ठेवून कोणी तयारी दर्शविल्यास आवश्यकतेनुसार स्वच्छतागृह उभारण्याचे महापालिकेचे धोरण आहे. पालिका सभेने याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. स्वच्छतागृहांचा वापर सुरू करण्यासाठी संबंधित खासगी संस्थेला महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, पाणी, वीज व सांडपाण्याची व्यवस्थाही करण्यात येईल, असे पालिकेचे धोरण राहणार आहे. सोमवारी या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Story img Loader