पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे. गडकरी यांच्या एका महानाट्यात संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज रोडवर संभाजी उद्यान आहे. मुठा नदी किनारी वसलेल्या या उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे. १९६२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हा पुतळा होता. राम गणेश गडकरी स्मारक समितीने पुणे महापालिकेला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला. हा पुतळा मुठा नदीत फेकण्यात आला होता. मंगळवारी सकाळी उद्यान उघडल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
उद्यानात महापालिकेने सुरक्षा रक्षक नेमल्याचे समजते. ऐवढ्या रात्री १० ते १५ कार्यकर्ते उद्यानात शिरले तरी त्याची माहिती सुरक्षा रक्षकांना कशी समजली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे असून यात हा प्रकार कैद झाला का हे अद्याप समजू शकलेले नाही. राम गणेश गडकरी यांच्या महानाट्यातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आक्षेप संघटनेने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. आगामी काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेड आणखी आक्रमक झाली आहे.मात्र राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याच्या या प्रकारावर नाराजीही व्यक्त होत आहे.