मोबाइल चोरी झाला.. पाकीट मारले.. रस्त्यात धक्काबुक्की झाली.. अशा प्रकारच्या छोटय़ा-मोठय़ा तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते, असा नागरिकांचा सहसा अनुभव आहे. पण, या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांकडून सांगवी, पिंपरी, विमानतळ आणि कोंढवा या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले. त्या वेळी तीन पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदवून न घेता तक्रारदावर प्रश्नांचा भडिमार पोलिसांकडून झाला. तर, एका ठिकाणी आवश्यक तक्रार लिहून घेण्यात आल्याचे आढळून आले. याबाबतची करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
पोलीस ठाण्यात गेलेल्या व्यक्तींची तक्रार नोंदवून घेतली गेली पाहिजे असा सीआरपीसी कायदा सांगतो. मात्र, सामान्य व्यक्तीला पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन जायची अगोदर भीतीच वाटते. ती व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा तक्रार देण्यासाठी त्यांना अनेक फे ऱ्या माराव्या लागतात. अशा अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुक्त्याळ यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. त्यानुसार त्यांच्या विभागातील सांगवी, पिंपरी, विमानतळ आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौकीत ३ एप्रिल रोजी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. चार चौकीत एका व्यक्तीला पाठवून तक्रार देताना त्याचे व्हिडीओ अथवा ऑडीओ चित्रीकरण करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांच्या विश्वासातील वकिलांची निवड करून त्यांना या ठिकाणी पाठविले.
सांगवी पोलीस ठाण्यात हद्दीतील चौकीत एका व्यक्ती दोन मुले त्रास देत असल्याची तक्रार देण्यासाठी गेली. मात्र, पहिल्या ठिकाणी त्या व्यक्तीची तक्रार न घेता हद्दीचा प्रश्न उपस्थित करीत दुसऱ्या पोलीस चौकीत पाठविले. त्या ठिकाणी सुद्धा त्यांची तक्रार न घेता त्या मुलांचे फोटो आहेत का, त्या मुलांची तुम्हीच माहिती काढा म्हणजे त्यांना तत्काळ अटक करता येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या व्यक्तीने तुम्ही अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार घेण्यास सांगितले, मात्र, त्यांना नकार देण्यात आला.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौकीत मोबाइल फोन चोरून नेल्याची तक्रार देण्यासाठी दुसरी व्यक्ती गेली. दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी टॅबलेट चोरून नेला असल्याचे जाऊन पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी ही घटना नेमकी कुठे घडली आहे, तुम्ही नंबर लिहून घेतला का, टॅबलेटची पावती द्या म्हणजे त्यावरून तो लॉक करता येईल. चोराला तो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला चार-चार मोबाइल घ्यायची काय गरज आहे. दोन दिवसांनी कागदपत्रे घेऊन या आणि साहेबांना भेटा मग तक्रार घेतली जाईल.
विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची चौकशीनंतर तक्रार लिहून घेतली. पायी जात असताना टू व्हीलरवर असलेली व्यक्ती धक्का मारून गेली, अशी तक्रार त्या व्यक्ती दिले. आपण विद्यार्थी असून वाडिया कॉलेजमध्ये शिकण्यास असल्याचे सांगितले. बसमधून उतरताना पाकीट मारल्याची तक्रार घेऊन एक व्यक्ती कोंढवा पोलीस चौकीत गेली होती. आपण या ठिकाणी एका मित्राला भेटायला आलो होतो. मारलेल्या पाकिटामध्ये दोन हजार रुपये होते. सुरुवातीला या व्यक्तीची तक्रार नोंदवून घेण्याअगोदर अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. ज्या पोलीस ठाणी अथवा चौक्यांमध्ये गुन्ह्य़ांची नोंद कमी होते. तसेच ज्या ठिकाणचा गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यासाठी खास विश्वासातील व्यक्ती निवडण्यात आल्या होत्या. या माहितीचा अहवाल तयार करून पोलीस आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यानंतर याबाबत काय कारवाई होणार हे स्पष्ट होणार आहे.

Story img Loader