िपपरी पालिकेच्या शाळा म्हणजे धर्मशाळा झाल्या आहेत, शाळांमधील साहित्य चोरीला जाते, शिक्षकांची कमतरता आहे, अनेक शाळांना मुख्याध्यापक नाहीत, बालवाडय़ा भरण्यासाठी योग्य जागा नाहीत, पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी नाही, अशाप्रकारचे अनेक मुद्दे उपस्थित करून सदस्यांनी पालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या कारभाराचा सभेत ‘पंचनामा’ केला. अखेर, यासंदर्भात, महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शिक्षण विभागावरील चर्चेत आर. एस. कुमार, शमीम पठाण, नितीन काळजे, रमा ओव्हाळ, भारती फरांदे, आशा शेंडगे आदींनी कडाडून हल्ला चढवला. पक्षनेत्या मंगला कदम यांनी सर्व सदस्यांच्या भावना आयुक्त राजीव जाधव यांच्यापुढे मांडल्या.िपपरीतील नगरसेवक सकारात्मक आहेत, प्रशासनाला नेहमीच सहकार्य करतात. मात्र, त्यांची कामे होत नाहीत. अधिकारी चुकीची माहिती देतात. प्रभागातील कामांविषयी त्यांची तळमळ समजून घ्यावी, असे त्या म्हणाल्या. आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.महापौरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाशी संबंधित सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्या कार्यपध्दतीवर झामाबाई बारणे, माया बारणे, दत्ता साने, अनिता तापकीर, रामदास बोकड, आशा शेंडगे आदींनी ताशेरे ओढले. पालिका रूग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका तसेच वॉर्डबॉयची कमतरता असल्याची कबुली आयुक्तांनी सभेत दिली.
‘आयुक्तांच्या बैठकीत अधिकारी झोपा काढतात’
आयुक्त नरमाईने वागतात, त्यांचा अधिकाऱ्यांना धाक राहिला नाही. त्यामुळे आयुक्तांच्या बैठकीतच अधिकारी झोपा काढतात. आयुक्तांनी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा सदस्यांनी सभेत व्यक्त केली. यापूर्वीचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कडक शिस्तीचा दाखला देत त्यांच्या काळात दिवसा सोडा तर रात्रीही अधिकारी झोपत नव्हते, अशी टिप्पणी एका सदस्याने केली.

Story img Loader