पिंपरी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. काळेवाडीतील नढेनगरच्या शाळेतील शेकडो विद्यार्थी अडगळीत बसून शिक्षण घेत आहेत. वारंवार तक्रार करूनही या अडगळीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे दाद मागितली आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा नढे यांनी दिला आहे.
नढेनगर येथील पालिकेचे कै. बंडू नढे प्राथमिक विद्यालय आहे. तेथील तिसऱ्या मजल्यावर कपाट, तुटलेल्या खुच्र्या, टेबल, बेंच आदी अडगळीचे साहित्य गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून अपघाताची शक्यताही आहे. उन्हाळ्याच्या सुटीत काही दुरुस्तीची कामे काढण्यात आली, तेव्हा हे साहित्य तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा हलवण्यात आले नाही. या ठिकाणी सातवीच्या ११ तुकडय़ा आहेत. एका वर्गात दोन तुकडय़ांना दाटीवाटीने बसवण्यात येते. या साहित्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी नढे यांनी अनेकदा केली. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नाही. पालिकेच्या अशापध्दतीने कारभारामुळे नागरिक संतापले आहेत. आता नढे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे. अन्यथा, पालकांसमवेत आंदोलनात उतरण्याची भूमिका घेतली आहे.
 
नव्या इमारतीच्या कामात दिरंगाई
नढेनगरच्या शाळेतील वर्ग कमी पडतात म्हणून विजयनगर येथे नवीन इमारत बांधण्यात येत आहे. मात्र, ठेकेदाराच्या मनाप्रमाणे काम होत असल्याने त्यात प्रचंड दिरंगाई होते आहे, याकडे विनोद नढे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

Story img Loader