संयुक्त मोहीम राबवून कुदळवाडीतील गैरप्रकारांना पायबंद घाला
फरार आणि अट्टल गुन्हेगारांचे ‘आश्रयस्थान’ मानल्या जाणाऱ्या चिखली कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांची बहुतांश दुकाने व गोदामेही बेकायदा आहेत. या भागात आगीच्या घटना नेहमी घडतात. मात्र, आगी लागतात की विशिष्ट हेतूने लावल्या जातात, याविषयी अनेक वर्षांपासून साशंकता आहे. त्यादृष्टीने कोणीही गांभीर्याने तपास करताना दिसत नाही. पालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडवणाऱ्या भंगार व्यावसायिकांच्या गोदामांना पालिकेच्याच बडय़ा अधिकाऱ्यांकडून ‘अर्थपूर्ण’ अभय दिले जाते. अग्निशामक दलाच्या ठराविक अधिकाऱ्यांचे ‘खिसे गरम’ होतात, म्हणूनच आगीच्या प्रकरणात पुढे काही घडत नाही. लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी ‘तडजोडीचे’ धोरण स्वीकारले जाते. अशा ‘लाभार्थ्यां’मुळेच ही गोदामे, दुकाने ‘जैसे थे’ असून आगी लागण्याचे संशयास्पद सत्र मात्र सुरूच आहे.
चिखलीतील कुदळवाडी हा अनेक अर्थाने ‘प्रसिद्ध’ भाग आहे. गुन्हेगारांचे आश्रयस्थान, बेकायदा दुकाने व गोदामांचा सुळसुळाट अशा अन्य ‘नको त्या’ उद्योगांमुळे या परिसराची वेगळीच अशी ख्याती बनली आहे. या ठिकाणी मोठय़ा संख्येने भंगार दुकाने व गोदामे आहेत. तेथे अचानक आगी लागतात, त्याचे खरे कारण उघड होत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सत्र सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल ३० वेळा आगी लागल्या आहेत. २२ सप्टेंबरला दुपारी अशीच आग लागली, तेव्हा चार गोदामांसह दहा दुकाने जळून खाक झाली. १८ टँकर घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा अडीच तासांनी ही आग आटोक्यात आली. आगीचे कारण गुलदस्त्यातच राहिले. या घटनेच्या निमित्ताने येथील आगींचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चिखली कुदळवाडी परिसराला चहूबाजूने भंगार व्यावसायिकांनी घेरलेले आहे. बंदिस्त असा हा भाग अनेक गैरप्रकारांचे केंद्रिबदू बनला आहे. सुरुवातीला यातील बहुतांश भंगाराची दुकाने पिंपरीलगतच्या मोरवाडीत होती. तेथे लोकवस्ती वाढू लागल्याने ती दुकाने इतरत्र हलवण्यात आली. एकेक करत त्या व्यावसायिकांनी चिखलीत कुदळवाडी परिसरात ठाण मांडण्यास सुरुवात केली. सद्य:स्थितीत या ठिकाणी भंगार व्यावसायिकांचे पूर्णपणे बस्तान बसले आहे. त्यांचा प्रचंड दबदबा असून ते कोणालाही जुमानत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. या भंगार व्यावसायिकांची नेमकी संख्या किती आहे, याची अधिकृत नोंद कोणाकडेही नाही.
चार हजाराच्या आसपास त्यांची संख्या असावी आणि यातील जवळपास ७० टक्के व्यावसायिक बेकायदा व्यवसाय करतात, असे सांगण्यात येते. गुंठय़ा-दोन गुंठय़ात कशाही प्रकारे बांधकामे करण्यात आली आहेत. पालिकेचे, प्रदूषण मंडळाचे अथवा कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियम पाळले जात नाहीत. पालिकेचा कर बुडवणारी या व्यावसायिकांची मोठी साखळी आहे. नियम पायदळी तुडवूनही पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही. कारवाईची वेळ आलीच तर हे व्यावसायिक पालिका अधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. अधिकारी शेपूट घालून बसतात. कारण ‘खाबूगिरी’ची थोर परंपरा आहे, ती कर्तव्याच्या आड येते.
जर्मन बेकरी स्फोटातील आरोपींनी याच ठिकाणी वास्तव्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. अनेक नामचीन गुन्हेगारांचा राबता येथे असतो. पोलिसांना त्याची इत्थंभूत माहिती असते. मात्र, ते काही करण्याच्या भानगडीत पडत नाहीत, त्यामागे अर्थकारणच आहे.
आगी जाणीवपूर्वक लावल्या जातात, असा संशय परिसरातील नागरिकांना आहे. त्यामागे विशिष्ट हेतू असतो, हे जगजाहीर आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी खासगी या शक्यतेला दुजोरा देतात. मात्र, खोलात जाऊन शोध घेण्याची तसदी कोणी घेत नाही. आगीच्या तक्रारी पोलिसांपर्यंत जात नाहीत.
आग लागल्यानंतर पुढे प्रकरण वाढवण्यात येत नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना येथून मोठय़ा प्रमाणात हप्ते मिळतात, हे उघड गुपित आहे. सतत आगी लागतात म्हणून पालिकेने येथे सर्वेक्षण घेतले. त्याद्वारे सर्व गोष्टींची माहिती एकत्रित करण्यात येणार होती. मात्र, त्याचे पुढे काय झाले कोणालाच कळले नाही. केवळ ‘कागदी घोडे’ नाचवण्यात आले. सतत लागणाऱ्या आगी आणि एकूणच या ठिकाणी होत असलेल्या गैरधंद्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
बेकायदा कामे करणाऱ्या व्यावसायिकांचे पाठीराखे आणि त्यांचे सूत्रधार शोधून काढले पाहिजेत, त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांनी रग्गड पैसे मिळतात म्हणून येथील दुष्कृत्यांकडे कानाडोळा करता कामा नये. ते अंगाशी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. येथील गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक अशी संयुक्त मोहीम राबवली पाहिजे. अन्यथा, एखाद्या दिवशी नको ते पाहण्याची वेळ येईल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
दोन वर्षांत जवळपास ३० आगीच्या घटना घडल्या आहेत. जागच्या जागी कचरा पेटवणे, शेकोटी करणे, वेिल्डग करणे, शॉर्टसर्किट यांसारखी आगीची कारणे सांगितली जातात. येथील बेशिस्त रचनेमुळे आग विझवताना मोठी अडचण निर्माण होते. दुकानांच्या मध्यभागी जाता येत नाही. परिणामी, आतील बाजूने आग वाढत जाते. एखाद्या घटनेत दोन-दोन दिवसही आग आटोक्यात येत नाही. त्यामुळेच सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील अतिक्रमणे तातडीने काढण्याची गरज आहे.
– किरण गावडे,
मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी पालिका.