पारपत्रासाठी अर्ज करताना आता भाडय़ाच्या घराचा पत्तादेखील ग्राह्य़ धरला जाणार आहे. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी झालेल्या घरभाडय़ाच्या कराराची पावती भाडेकरूला पारपत्रासाठी अर्ज करताना पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे. पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विदेश मंत्रालयाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पारपत्र अधिकाऱ्यांकडून तसेच नागरिकांकडून घरभाडय़ाच्या कराराला पारपत्र देण्याच्या प्रक्रियेत पत्त्याचा पुरावा म्हणून स्थान असावे अशी मागणी केली जात होती. या विषयावर मंत्रालयाने विधी व करार विभागाचे मार्गदर्शन घेऊन भाडेकराराला पत्त्याचा पुरावा मानण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे ‘नोंदणी कायदा १९०८’ च्या कलम १७ अंतर्गत घरमालक व भाडेकरू यांच्यात एक वर्षांपेक्षा अधिक काळासाठी झालेला भाडेकरार पारपत्रासाठी अर्ज करताना पत्त्याचा पुरावा म्हणून सादर करता येणार आहे.