धोकादायक पद्धतीने आकडे टाकून वीजचोरी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषत: झोपडपट्टी भागात असे प्रकार जास्त प्रमाणात दिसून येतात. यमुनानगर ओटा स्किम भागात धोकादायक पद्धतीने आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार जास्त असल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड हे आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिकीकरण झालेल्या या शहरामध्ये राज्यासह परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही वाढत आहे. त्यामुळे झोपडपट्टय़ाही तितक्याच झपाटय़ाने वाढत आहेत. नागरी सुविधांमध्ये वीज ही अत्यावश्यक सेवा मानली जात असल्याने महावितरण कंपनीकडून झोपडपट्टय़ांमध्ये वीज पुरवठा केला जातो. मात्र, या झोपडपट्टय़ांमध्ये बेकायदेशीररीत्या आकडे टाकून वीज घेतली जात आहे. अतिशय धोकादायक पद्धतीने वीजचोरी केली जात असल्याचे प्रकार यमुनानगर, भीमशक्तीनगर यासह इतर झोपडपट्टय़ांमध्ये होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
यमुनानगर ओटा स्कीम भागात महापालिकेच्या शाळेच्या आवारातील विद्युत रोहित्रामध्ये आकडे टाकल्याने अक्षरश: केबलचे जाळे तयार झाले आहे. शेकडो विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. खेळताना चुकून एखादा विद्यार्थी त्या रोहित्राकडे गेलाच तर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आकडे टाकून घेतलेली चोरीची वीज विकून त्यावर पैसे कमाविण्याचा धंदा झोपडपट्टी भागात राजरोसपणे होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना असली तरी जुजबी कारवाई करण्याच्या पलीकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे अशा वीज चोरांना वीज चोरी करताना कोणाचाही धाक नाही अशी परिस्थिती आहे.
बहुतांश विद्युत संचांना झुडपे, वेलींचा विळखा
पिंपरी : महावितरणने शहरातील रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बहुतांश विद्युत संचांना झाडेझुडपे आणि वेलींनी वेढले आहे. त्यामुळे विद्युत संचासाठी उभ्या केलेल्या लोखंडी खांबामध्ये वीज उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
महावितरण कंपनीने शहरामध्ये बहुतांश ठिकाणी २२ तसेच ३३ के.व्ही.चे विद्युत संच रस्त्याच्या कडेला उभे केल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळते. या संचामध्ये असणाऱ्या उच्चदाब वाहिनीमुळे धोक्याचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वर्षभरापूर्वी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर रोहित्राला पत्र्याच्या साहाय्याने संरक्षक कवच तयार करण्यात आले. मात्र पत्र्याचे हे संरक्षक कवच शहरातील सर्व रोहित्रांना बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे उघडय़ावर असलेल्या रोहित्रांमुळे धोका होऊ शकतो. मुख्य चौकात असणाऱ्या रोहित्राच्या कडेलाच कवच बसवून महावितरण कंपनीने देखावा निर्माण केल्याचे शहरातील रोहित्रांची पाहणी केल्यानंतर स्पष्ट होत आहे.
उच्चदाब वीज वाहिन्यांचे संचही रस्त्याच्या कडेलाच उभे केल्याचे पाहायला मिळते. या संचाच्या भोवती लोखंडी जाळी बसवून संरक्षण देण्याचा प्रयत्न महावितरण कंपनीने केला आहे. मात्र या लोखंडी जाळीवर वेलवर्गीय वनस्पती मोठय़ा प्रमाणात वाढल्या असल्याचे दिसते. शिवाय इतर झाडेझुडपेही मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत.
बहुतेक विद्युत पेटय़ांची झाकणे निखळलेली
पिंपरी : ग्राहकांना वीज जोड देण्यासाठी निर्माण केलेल्या भर वस्तीमधील विद्युत पेटय़ांची झाकणे काही ठिकाणी निखळली आहेत, तर काही ठिकाणी ही झाकणे उघडी आहेत. शहरामध्ये अशा पेटय़ा बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतात. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीज देण्यासाठी जमिनीखाली केबल टाकून वीज पुरवठा केला जातो. वीज जोड देण्यासाठी जागोजागी विद्युत पेटय़ांमध्ये विद्युत संच बसविण्यात आले आहेत.
तेथूनच तेथील रहिवाशांना वीज जोड दिले जातात. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पेटय़ांची झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पेटय़ा उघडय़ाच राहतात. झाकणे नसल्यामुळे विद्युत संचाला लावलेल्या वायर उघडय़ावर येतात. भर वस्तीमध्ये असलेल्या या उघडय़ा पेटय़ांमुळे नागरिकांना तसेच त्या पेटीजवळ खेळण्यासाठी वावरणाऱ्या लहान मुलांना धोका होऊ शकतो. नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
‘लोकसत्ता’ने दोन महिन्यांपूर्वी आकुर्डीतील पांढारकरनगर ते आकुर्डी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या विद्युत पेटय़ा उघडय़ा असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तत्परता दाखवत महावितरण कंपनीने तेथील विद्युत पेटय़ा दुरुस्त केल्या. शहरातील फुलेनगर येथील उघडय़ा पेटीच्या विद्युत संचामधील वायरचा धक्का लागून पाळीव प्राणी दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. फुलेनगर प्रमाणेच शहराच्या इतर भागातही महावितरणच्या विद्युत पेटय़ा उघडय़ा आहेत. त्याकडेही महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो.
‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..
- रोहित्राच्या भोवती असणाऱ्या संरक्षक जाळ्यांना वेली आणि झाडाझुडपांचा वेढा
- चिखली भागात उच्चदाब वीज वाहिनीखाली बेकायदेशीरपणे बांधकामे
- शहराच्या बहुतांश भागात विद्युत पेटय़ांची झाकणे उघडी आणि निखळलेली
- झोपडपट्टी भागात अनधिकृतपणे आकडे टाकून वीज चोरी
- भर रस्त्यावरील रोहित्रांची उंची कमी असल्यामुळे धोक्याची शक्यता