पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या कायद्याची दुरूस्ती २० जानेवारीपर्यंत होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी थेरगाव येथे केली. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ग्वाही दिली असून आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यामुळे अधिकाधिक कामाचा निपटारा लवकर व्हावा, जनहिताचे निर्णय घेता यावेत, यासाठी आठवडय़ातून दोन वेळा मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
थेरगाव डांगे चौकातील २१ कोटी रूपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे, स्थानिक नगरसेवक झामाबाई बारणे, माया बारणे, नीलेश बारणे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अजितदादांनी पिंपरी पालिकेच्या तसेच प्राधिकरणाच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विरोधक विकासाच्या कामात राजकारण करतात, अशी टीकाही केली.
पवार म्हणाले,‘‘अनधिकृत बांधकामप्रकरणी ‘अजित पवारांचा बोलाची कढी, बोलाचा भात’, ‘बाबा-दादांचे खोटे आश्वासन’ असे काहीही छापतात. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, २० जानेवारीच्या आत याबाबतचा निर्णय होईल. मी स्वत: पाठपुरावा करतो आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आम्हाला आश्वासन दिले आहे व सभागृहातही तशी ग्वाही दिली आहे. बांधकामांवर कारवाई होईल, यावरून नागरिकांमध्ये कमालीची भीती आहे. ही अस्वस्थता नव्या वर्षांच्या सुरूवातीलाच दूर होईल, याची खात्री वाटते. सरकार कोणीही चालवत असले तरी त्यातून व्यवहार्य मार्ग काढावा लागेल. आरक्षणे व रस्त्यांवर झालेली बांधकामे वाचवता येणार नाहीत. मात्र, अन्य बांधकामांच्या बाबतीत व्यवहार्य मार्ग काढू. मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन एका महिन्यात निर्णय घेऊ असे जाहीरपणे म्हणाले आहेत. तो शब्द ते नक्की पाळतील, असा विश्वास वाटतो, असे अजित पवार म्हणाले. प्रास्ताविक श्रीकर परदेशी यांनी केले. या वेळी महापौर, श्रीरंग बारणे यांची भाषणे झाली. राजू मिसाळ यांनी आभार मानले
..तर अजित पवारचे बांधकाम पाडावे लागेल!
पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे केली, त्यावरून त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली, या कारवाईचे अजितदादांनी समर्थन केले. चुकीचे काम केल्यास नियमानुसार कारवाई होईल. अजित पवारचे घर रस्त्यात किंवा आरक्षणात असल्यास तेही पाडावे लागेल, त्याविषयी वेगळी भूमिका घेता येणार नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader