पिंपरी पालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत द्यायचे स्वेटर रणरणत्या उन्हाळ्यात वाटण्याची थोर पंरपरा शिक्षण मंडळाने वर्षांनुवर्षे कायम ठेवली आहे. चालू वर्षांत ती खंडीत होणार की मागचेच पाढे पुन्हा वाचले जाणार, असा सवाल केला जात असतानाच पावनेदोन कोटीच्या स्वेटर खरेदीत कागदी स्पर्धा दाखवून ‘फिक्सींग’ करण्याचेच ‘उद्योग’ दिसून येत आहेत.
िपपरी पालिकेच्या पहिली ते सातवीच्या जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून पुढील प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. १८ नोव्हेंबरला शाळा सुरू होणार आहेत. त्यानंतर पात्र पुरवठाधारकास स्वेटर वाटपाच्या कामाचे आदेश दिले जाणार आहेत. तेथून पुढे विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने स्वेटर मिळू लागतील, असे मंडळातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात, नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला. अजून मूळ प्रक्रियाच सुरू झाली नाही. संथ कारभारामुळे प्रत्यक्षात स्वेटर उपलब्ध होण्यास बराच कालावधी जाणार आहे. स्वेटर खरेदीचे काम कोणास द्यायचे, यावरून बरेच अर्थकारण होण्याची चिन्हे आहेत. नऊ जणांनी निविदा दाखल केल्या आहेत. प्रत्यक्षात, मक्तेदारी असलेल्या ठराविक पुरवठाधारकांनीच वेगवेगळ्या नावांनी निविदा दाखल केल्या आहेत. निविदा हा दिखावू कारभार असून कोणाला काम द्यायचे, कोणी किती घ्यायचे, ते आधीच ठरलेले आहे. त्यानुसारच स्वेटरचे व अन्य गोष्टींचे वाटप होईल, असे चित्र आहे. यासंदर्भात, मंडळाचे सभापती फजल शेख यांनी, कोणतीही फिक्सींग होणार नाही, सर्व काही नियमानुसार पार पडेल आणि विद्यार्थ्यांना वेळेत स्वेटर दिले जातील, असा दावा केला आहे.
उन्हाळ्यात स्वेटर वाटण्याची पिंपरी शिक्षण मंडळाची परंपरा खंडीत होणार का?
पिंपरी पालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत द्यायचे स्वेटर रणरणत्या उन्हाळ्यात वाटण्याची थोर पंरपरा शिक्षण मंडळाने वर्षांनुवर्षे कायम ठेवली आहे. चालू वर्षांत ती खंडीत होणार की मागचेच पाढे पुन्हा वाचले जाणार.
First published on: 09-11-2013 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional abstract in distribution sweater of pimpri education association