पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पीएमपीएल संचालक मंडळाची पहिली बैठक वादळी ठरली आहे. महिलांसाठी विषेश बस सेवेच्या संदर्भातील मुद्द्यावर पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा साळवे आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात शुक्रवारी शाब्दिक वादावादी झाली. या बैठकीतील वादावर साळवे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड या शहरात कामानिमित्त महिला पीएमपीएलने प्रवास करतात. प्रवासादरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याची मागणी या बैठकीत केली. या मागणीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांसाठी बस असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. याप्रकारानंतर ‘तुम्हाला पाहिजे तसे काम करा’, असे सांगत टेबलवर फाईल आपटत मुंढे सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी सदस्यांनी त्यांना बसण्याची विनंती केली, अशी माहिती त्यांनी दिली.

या मागणीनंतर पुण्यातील काही मार्गावर महिलांसाठी खास बस सेवा आहे, मात्र पिंपरी-चिंचवड मार्गावर बस सेवा नसल्याची माहिती पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच लवकरच बस सेवा सुरु करू, असे आश्वासन  देण्यात आल्याचे साळवे यांनी सांगितले.  साळवे आणि मुंढे यांच्यात संचलन तुटीसंदर्भातील चर्चेदरम्यानही पुन्हा वाद झाला. ज्या प्रकारे आम्ही नियमानुसार, ४० टक्के हिस्सा देतो. तो निधी घेण्यासाठी तुम्ही पिंपरी- चिंचवड महापलिकेत स्वत: यावे, यातून पिंपरीकरांच्या आधिक समस्या समजण्यास मदत होईल. तुम्ही न आल्यास संचलन तूट दिली जाणार नाही, असा पवित्रा साळवे यांनी घेतला. यावर पिंपरीमध्ये केव्हा येणार याबाबत पालिका आयुक्तांना कळवेन, असे मुंढे यावेळी म्हणाले. या बैठकीला पीएमपएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरूलीधर मोहाळ, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे उपस्थित होते. याप्रकरणी तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

Story img Loader