पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांना सव्वा वर्षांसाठी देण्यात आलेल्या महापौरपदाची मुदत पूर्ण झाली असून यापूर्वीचे महापौर योगेश बहल व मंगला कदम यांच्याप्रमाणेच लांडे यांनाही अडीच वर्षांचे महापौरपद देण्याचा निर्णय सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे महापौर लांडे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, अशीच चिन्हे आहेत.
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर पहिल्या वर्षी महापौरपद देण्यात आले. सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर झामाबाई बारणे, नंदा ताकवणे यांच्यासह अनेक नगरसेविकांनी दावा सांगितला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखतींचा फार्स केला व ठरल्याप्रमाणे लांडे यांनाच पहिल्या वर्षी संधी दिली. अन्य इच्छुक नाराज होऊ नयेत, यासाठी सव्वा वर्षांनंतर पुढचे पाहू, अशी वेळ मारून नेण्यात आली. लांडे यांनी अनुभवाच्या जोरावर सव्वा वर्षांत चांगल्या पद्धतीने काम केले. मात्र, अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी येणारे नगरसेवक, नागरिक व त्यावरून आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याशी संघर्ष व भोसरी मतदारसंघाचे राजकारण करण्यातच त्यांचा बहुतांश वेळ गेला. निर्धारित सव्वा वर्षांनंतर मोहिनी लांडे महापौरपद सोडतील, अशी कोणतीही शक्यता नाही. विलास लांडे यांची नाराजी नको म्हणून अन्य इच्छुकांनीही महापौरपदाची मागणी करण्याचे टाळले आहे. ‘जो न्याय बहल व कदम यांना, तोच आम्हालाही’ असा लांडे समर्थकांचा सूर आहे. अजितदादांनाही आगामी लोकसभा व विधानसभेचे गणित मांडताना महापौर बदलाचा विषय काढून आयतेच दुखणे आणायचे नाही. त्यामुळे महापौरांना अघोषित मुदतवाढ मिळाल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात, अजितदादाच निर्णय घेतील, असे सांगत स्थानिक नेते कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीत.

Story img Loader