‘सोशल मीडिया’ चा मोठय़ा प्रमाणात होत असलेला वापर लक्षात घेता पिंपरी पालिका ‘फेसबुक’वर जाण्याने शहरातील नागरिकांच्या मनातील भावभावना आपल्याला कळू शकतील व त्याचा उपयोग सेवासुविधा देताना होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केला. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी ‘फेसबुक’वर राजकीय व्यक्तींविषयी गरळ ओकण्याची घटना ताजी असतानाच ‘फेसबुक’वर जबाबदारीने ‘प्रकट’ व्हा, असा सल्ला आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.
पिंपरी पालिकेच्या ‘फेसबुक पेज’ चे उद्घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, विरोधी पक्षनेते कैलास कदम, सहआयुक्त पांडुरंग झुरे, शहर अभियंता महावीर कांबळे आदी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले, ‘फेसबुक’ मुळे पिंपरी पालिकेची सेवाक्षेत्रात ओळख होईल. तरुणाई मोठय़ा प्रमाणात ‘सोशल मीडिया’ चा वापर करते. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून बदलते तंत्रज्ञान अधिकाधिक नागरिकांपर्यंत जाईल, माहितीचा प्रसार वेगाने होईल. नागरिकांच्या मनात काय आहे, ते कळू शकेल. पालिकेच्या विविध योजना, शासन आदेश, धोरणात्मक निर्णय आदींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल. ‘फेसबुक’ वर जबाबदारीने प्रकट झाले पाहिजे, त्यासाठी याबाबतची जबाबदारी सहायक आयुक्तांवर निश्चित करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. महापौर लांडे म्हणाल्या, पालिकेने ‘सारथी हेल्पलाइन’ सुरू केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘फेसबुक’ त्यापुढचे पाऊल आहे. त्यामुळे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध होऊ शकेल. फोटो, व्हिडियोतून पर्यटकांनाही माहिती मिळेल, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले.

Story img Loader