आज वट पोर्णिमा, आजच्या दिवशी प्रत्येक महिला वट सावित्रीची पूजा करताना दिसते. सात जन्मी हाच पती मिळावा, अशी मनोकामना महिला या दिवशी करतात. पण स्री-पुरुष समानतेचे दर्शन दाखवत पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवीतील पुरुषांनी देखील वट वृक्षाची पूजा करत, सात फेरे घालत एक नवा विचार दाखवून दिला. पुरुषांनी देखील पुढील सात जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाची पूजा करावी, अशी अपेक्षा महिलांना देखील असते.  पिंपरी- चिंचवडच्या नवी सांगवीत पुरुषांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत, वट सावित्रीची पूजा केली. फक्त महिलांनीच हा सण साजरा करावा, या परंपरेला पुरुषांनी छेद दिला. नवऱ्याला दिर्घायुष्य लाभावे, तसेच पुढील सात जन्म तोच नवरा जोडीदार म्हणून मिळावा, असे साकडे महिला घालू शकतात, तर हीच पत्नी जोडीदार म्हणून सात जन्म भेटावी, यासाठी पुरुषांनी पुढाकार का घेऊ नये, या विचारातून पुरुषांनी हा उत्सव साजरा केला. यासाठी त्यांनी वट वृक्षाला दोरा गुंडाळत सात फेरे देखील घातले.

मानवी हक्क संरक्षण जन जागृतीच्यावतीने राबवण्यात आलेल्या  पुरुषांच्या या उपक्रमाचे महिलांनी देखील स्वागत केले. महिलावर्गांकडून पुरुषांच्या नव्या विचारधारेचे कौतुक होत आहे. सांगवीतील पुरुषांनी नवा पायंडा पाडून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगताना दिसत आहे. हा पायंडा पुढे अखंडित सुरु राहिला तर खऱ्या अर्थाने महिलांना पुरुषांइतकच स्थान समाजात मिळालं हे नक्की.

Story img Loader