ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि व्याख्याते निनाद बेडेकर यांचे रविवारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. पुण्यातील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निनाद बेडेकर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व होते. अभ्यासू वृत्तीच्या बेडेकर यांचे मोडी, फार्सी या दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. त्यांनी आपल्या संशोधनातून पानीपतचा प्रत्यक्ष इतिहास जगासमोर आणला. आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी हा इतिहास प्रभावीपणे श्रोत्यांसमोर मांडला. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. याशिवाय, अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून ते इतिहासाविषयी लेखन करत असत.