लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण हळूहळू तापत असतानाच या वेळी मतदारही जागरूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. मतदानाला गेल्यानंतर ऐनवेळी यादीत नाव नसल्याचा अनुभव हजारो मतदारांना दर निवडणुकीत येतो. त्यामुळे पुण्यातील मतदार आतापासूनच नावाची खात्री करून घेत असून त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर सध्या रोज किमान चारशे ते पाचशे कॉल येत आहेत.
मतदारयाद्यांच्या घोळाचे अनुभव दर निवडणुकीत मतदारांना येतात आणि त्याचा फटका हजारो मतदारांना बसतो. पण मतदानाच्या दिवशी जागे होऊन उपयोग होत नाही आणि यादीत नाव नसेल तर मतदानही करता येत नाही. नेमकी माहिती नसल्यामुळे या केंद्रावरून त्या केंद्रावर अशी फिरतीही करायची वेळ अनेक मतदारांवर येते. या वेळी मात्र हा अनुभव येण्यापेक्षा यादीत नाव आहे का नाही याची खात्री आधीच करून देण्यासाठी राजकीय पक्षांनी व्यवस्था सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे ‘व्होट फॉर इंडिया हेल्पलाईन’ या उपक्रमांतर्गत बाजीराव रस्त्यावर नातूबागेजवळ सुरू करण्यात आलेल्या केंद्राला रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मदतकेंद्रासाठी १८००२३३०००४ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून या क्रमांकावर संपर्क साधून मतदाराने त्याचे नाव सांगितल्यानंतर थोडय़ाच वेळात मतदाराला त्याच्या मोबाईल क्रमांकावर त्याचे नाव कोणत्या मतदारसंघात, कोणत्या यादीत आहे, यादीतील अनुक्रमांक किती आहे, मतदान केंद्राचे नाव काय आहे आणि ते कोणत्या भागात आहे याची माहिती असलेला एसएमएस केला जातो, असे या केंद्राचे प्रवर्तक नगरसेवक हेमंत रासने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ही सुविधा पूर्णत: नि:शुल्क असून १७ फेब्रुवारी रोजी या मदत केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर रोज दोनशे ते तीनशे पर्यंत विचारणा होत होत्या. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र येणाऱ्या कॉल्सची संख्या आता दुप्पट झाली असून केंद्रासाठी लवकरच तीन ऐवजी पाच लँडलाईन घेणार असल्याचेही रासने यांनी सांगितले.
या सुविधेत मतदाराला त्याचा यादीतील अनुक्रमांक एसएमएसद्वारे कळत असल्यामुळे ही सुविधा मतदारांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील चोवीस लाख मतदारांची माहिती उपलब्ध असून नव्या नोंदणीनंतर ती नावेही समाविष्ट केली जाणार असल्याचे ओडीपी सॉफ्टवेअरचे संचालक ज्ञानेश शेलार यांनी सांगितले. मतदारयादीत नाव आहे का, नाव नसेल तर ते कसे नोंदवायचे, मतदान ओळखपत्र आलेले नाही, ते कसे मिळवायचे, मतदान केंद्र कुठे आहे अशा अनेक विचारणा मतदारांकडून होतात. पुण्याबाहेरच्या मतदारांकडूनही विचारणा होते, असाही अनुभव शेलार यांनी सांगितला.

मतदार यादीतील नावाच्या माहितीसाठी:
– टोल फ्री क्रमांक १८००२३३०००४
– मतदारांसाठी नि:शुल्क एसएमएस सुविधा

Story img Loader