गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला प्रभाग कार्यालयांची संख्या वाढवण्याचा विषय अखेर मार्गी लागला असून सध्याच्या चार प्रभागांमध्ये आणखी दोनची भर पडणार आहे. तथापि, या सहा कार्यालयांना प्रभाग कार्यालये असे न संबोधता पुणे महापालिकेप्रमाणेच ‘क्षेत्रीय कार्यालय’ असे त्यांचे नामकरण राहणार आहे. येत्या पालिका सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
पिंपरी पालिकेत सध्या अस्तित्वात असलेले अ, ब, क आणि ड हे चारही प्रभाग २० सप्टेंबर १९९५ ला स्थापन झाले होते. राज्यशासनाने दिलेल्या आदेशानुसार ११ सप्टेंबर १९९७ ला पिंपरीची हद्दवाढ झाली आणि लगतची १८ महसुली गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. तथापि, ताथवडे हे गाव बेटाप्रमाणे मध्यभागी तसेच राहिले होते. पुढे, ३० जुलै २००९ ला त्याचाही पिंपरीत समावेश झाला. आता शहरात ६४ प्रभाग असून १२८ नगरसेवक आहेत. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या १८ लाखाच्या घरात आहे. सध्याचे क्षेत्र व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रभागांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. पायाभूत सुविधा व कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता लक्षात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यास मान्यता दिली होती. तथापि, अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा विषय रखडला होता. तथापि, त्यास मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार, सध्याच्या चार प्रभाग संख्येत दोनने वाढ होणार आहे. या कार्यालयांना प्रभाग संबंधित केल्याने होणारी संभ्रमावस्था टाळण्यासाठी यापुढे त्यांचे नामकरण ‘क्षेत्रीय कार्यालय’ असे होणार आहे.
प्रस्तावित ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय भेळ चौकातच असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक ८, १०, १४ ते १९ व २५ ते २७ अशा ११ प्रभागांचा समावेश आहे. ‘ब’ क्षेत्रीय  कार्यालय एल्प्रो कंपनीसमोरच राहणार असून त्यात २० ते २४, ४२ व ४९ ते ५३ या प्रभागांचा समावेश असेल. ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हॉकी मैदानालगतच राहणार असून त्यात ३७, ३९ ते ४५ व ६१ ते ६४ या प्रभागांचा समावेश आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय रहाटणी येथेच असून ४६ ते ४८ व ५४ ते ६० या प्रभागांचा समावेश आहे. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय भोसरीतील ‘ग्रोथ लॅब’ येथे होणार असून ६, ७ व २९ ते ३६ तसेच ३८ या प्रभागांचा समावेश आहे. ‘फ’ कार्यालयाची जागा अद्याप ठरलेली नसून त्यात प्रभाग क्रमांक १ ते ५ व ९, ११ ते १३ तसेच प्रभाग क्रमांक २८ या प्रभागांचा समावेश राहणार आहे.

Story img Loader