शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून पिंपरी पालिका सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाची लक्तरे काढली. मात्र, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र पुढे आले आहे. पिंपळे निलख व परिसरातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा आणू व अधिकाऱ्यांना मुख्यालयात अंघोळ घालू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे यासंदर्भातील भावना व्यक्त केल्या आहेत. तीन महिन्यांपासून क्रांतीनगर, गणेशनगर, विनायकनगर, वाकवस्ती, शिक्षक सोसायटी, गावठाण आदी भागात फक्त अर्धा तास पाणी येते, तेही वेळी-अवेळी व अपुऱ्या दाबाने मिळते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे साठे यांनी म्हटले आहे.
पालिका सभेत नगरसेवकांनी पाण्यावरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तेव्हा आठ ते दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाही पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महावीर कांबळे यांनी महापौर शकुंतला धराडे यांना दिली होती. प्रत्यक्षात, तशा कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यातच, पिंपळे निलखच्या पाणीपुरवठय़ावरून आंदोलनाचा पवित्रा घेत काँग्रेसने गुरूवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानिमित्ताने महापालिका अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा उघड झाला आहे.

Story img Loader