पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी उंटावर बसून कविता सादर करण्याचा अनोखा उपक्रम सांगवीतील ‘शब्दगंध काव्यमंच’ या संस्थेने मंगळवारी राबवला. उंटाप्रमाणे पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहन करणाऱ्या या वेगळ्या उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
पिंपळे गुरव शब्दधन काव्यमंच आणि रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या सांगवीतील समतानगर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत राबवण्यात आला. त्यामध्ये परिसरातील २० कवी सहभागी झाले होते. पाण्याची बचत, पाण्याचा काटकसरीने वापर या विषयावर अनेकांनी कविता सादर केल्या. या संदर्भात, संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सांगितले, की उंट उदरात पाणी साठवतो व पाण्याची बचत करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने पाण्याची बचत करावी. आगामी काळात कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा तुटवडा होऊ शकतो. त्या दृष्टीने आतापासूनच पाण्याची बचत करावी. या बचतीचे धडे उंटाकडून घ्यावेत, या हेतूने उंटावर बसून कविता सादर करण्याचा उपक्रम राबवला. नागरिकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

Story img Loader