परिवहन आणि पोलीस विभागाकडून दुर्लक्ष; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जवळपास १५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. त्यातील बहुतांश रिक्षा विनापरवाना असून याकडे परिवहन आणि पोलीस विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
शहराच्या विविध उपनगरांमध्ये जाण्यासाठी पीएमपीची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने रिक्षानेच प्रवास करावा लागतो. त्यातील अनेक रिक्षांना आरटीओचा परवाना नाही, विनापरवाना रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांचा विमाही काढलेला नसतो. रिक्षांची कालमर्यादा संपल्यानंतरही अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक केला जाते. विनापरवाना चालणाऱ्या रिक्षांची कोणतीही तपासणी आरटीओकडून केली जात नाही. वाहन सक्षमता प्रमाणपत्र, पीयूसी आणि इतर कोणत्याही प्रकारच्या चाचण्या बहुतांश रिक्षा चालकांडून केल्या जात नाहीत. आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून विनापरवाना प्रवासी वाहतूककरणाऱ्या रिक्षांवर कधीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा रिक्षा बिनदिक्कतपणे प्रवासी वाहतूक करून प्रवाशांच्या जीवांशी खेळ करतात.
पिंपरी-चिंचवड शहराचा जसा विस्तार होत आहे, तसा शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
परवानगी नसतानाही शेअर रिक्षा जोरात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शेअर रिक्षाला परवानगी नसतानाही रिक्षाचालकांकडून शहरातील अनेकविध मार्गावर अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक सुरू आहे. तीन आसनी रिक्षांमध्ये सहा ते सात प्रवासी घेऊन नियम धाब्यावर बसविण्याचे काम रिक्षा चालकांकडून शहरामध्ये सर्रासपणे होत असल्याचेही दिसते.
परिवहन विभागाने शहरामध्ये कोणत्याही मार्गावर शेअर रिक्षाला परवानगी दिलेली नाही. मात्र, तरीही शहरामध्ये बहुतांश मार्गावर शेअर रिक्षा बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी, आकुर्डी ते चिखली, डांगे चौक ते औंध, भोसरी ते नाशिक फाटा, काळेवाडी ते पिंपरी, पिंपरी ते भोसरी, चिंचवड ते डांगे चौक, निगडी ते भोसरी, मोशी ते भोसरी, चिखली ते मोशी फाटा, निगडी ते देहू, डांगे चौक ते हिंजवडी आदी मार्गावर टप्पा वाहतूक अनधिकृतपणे केली जाते. चौकात कोठेही थांबून प्रवाशांना खेचण्याची स्पर्धा रिक्षाचालकांमध्ये लागलेली असते. रिक्षाने कोठे जायचे नसले तरी रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना रिक्षा चालक कोठे यायचे असे विचारून भंडावून सोडतात. टप्पा वाहतूक करणारे रिक्षा चालक मनमानी पद्धतीने भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट करतात. महिला प्रवाशांचा विचारही केला जात नाही. टप्पा वाहतूक करताना महिलांच्या सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. सहा ते सात प्रवासी कोंबून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडे देऊनही सुरक्षित प्रवास करता येत नाही.
अनेक अल्पवयीन मुले रिक्षाचालक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक रिक्षाचालक नियम तोडून रिक्षा चालवितात. बहुतांश रिक्षा चालकांकडे चालक परवाना, बॅचबिल्ला नाही तर अनेक अल्पवयीन मुले रिक्षा चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळतात. यामध्ये परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक उदरनिर्वाहासाठी येऊन वास्तव्य करतात. काम मिळाले नाही की रिक्षा चालविण्याचा धंदा केला जातो. परप्रांतीय रिक्षा चालकांना वाहतुकीचे नियम माहिती नसतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने रिक्षा चालवून असुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे प्रकार शहरामध्ये होतात. प्रवासी वाहतुकीचा कोणताही दर्जा पिंपरी-चिंचवड शहराला राहिलेला नाही. ग्रामीण भागातील रिक्षाचा परवाना काढून शहरामध्ये रिक्षा चालवून आरटीओच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार रिक्षाचालकांकडून केला जात आहे.
अनेक रिक्षांना मीटर नाही. विना मीटर रिक्षा चालवून प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारले जाते. भाडे नाकारून टप्पा वाहतूक केली जाते. रिक्षांची संख्या वाढल्यामुळे प्रवासी खेचण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये भांडणाचे प्रकारही वाढत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. भाडे नाकारल्यानंतर कारवाईची भाषा करणाऱ्या आरटीओकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक रिक्षा चालक अमली पदार्थ घेऊन रिक्षा चालवतात त्यामुळे अशा रिक्षा चालकांकडून प्रवाशांना उद्धट वागणूक मिळते.