वाशिमच्या संगीताने स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र विकले, पंकजाताईंनी लक्ष घातले आणि तिला पुन्हा सोन्याचे मंगळसूत्र मिळाले. या घटनेचा आदर्श घेत पिंपरी-चिंचवड ‘बेस्ट सिटी’तील महिलांनी स्वच्छतागृहाच्या प्रलंबित मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा आणला. संगीताप्रमाणे आम्हीही मंगळसूत्र विकायचे काय, असा मुद्दा त्यांनी महापालिका प्रशासनासमोर उपस्थित केला, तेव्हा अधिकाऱ्यांची चांगली धावपळ उडाली.
वाशिमच्या साईखेडा गावातील संगीता ओव्हाळने घरात स्वच्छतागृह उभारण्यासाठी मंगळसूत्र विकले, या घटनेची माहिती झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्या महिलेचा शोघ घेतला, तिला मुंबईत बोलावून घेतले आणि सोन्याचे मंगळसूत्रही दिले. या घटनेला प्रसारमाध्यमांकडून मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. ती घटना डोळ्यासमोर ठेवून चिखलीतील भीमशक्तीनगर भागातील महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा आणला, त्यासाठी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांचे ‘मार्गदर्शन’ लाभले. सकाळीच या महिला मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमल्या, त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. आमच्याकडे स्वच्छतागृहे नाहीत, महिलांना उघडय़ावर बसावे लागते, त्यासाठी अंधार होण्याची वाट पाहावी लागते. महापालिकेचे अधिकारी परवानगी देत नाहीत, असे त्या महिलांचे म्हणणे होते. जोपर्यंत स्वच्छतागृहांचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, आंदोलन मागे घेण्यात आले.
संगीताने स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र विकल्याचे या महिलांनी वाहिन्यांवर पाहिले. आपली समस्या स्वच्छतागृहाचीच आहे. त्याकडे लक्ष दिले जात नसल्याच्या भावनेतून आंदोलन झाले. आम्हीही मंगळसूत्र विकायचे का, तशी वेळ आमच्यावर प्रशासनाने आणली आहे, अशी त्या महिलांची भावना झाली आहे.
– सुलभा उबाळे
गटनेत्या, शिवसेना</span>