पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दौरा केला, मात्र त्यापुढे काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेचा कारभार भारतीय जनता पक्षाकडे आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे निदान रुग्णालयाशी संबंधित प्रश्न सुटण्यासाठी फार काही परिश्रम करायची गरज नाही. राजकीय इच्छाशक्ती ठेवून काम केल्यास अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी होण्यास वेळ लागणार नाही. एकनाथ पवारांची एकूणच कार्यपद्धती पाहता, केवळ राजकीय स्टंटबाजी आणि चमकोगिरी नको, तर ठोस कृती झाली पाहिजे. कमी खर्च आणि चांगले उपचार मिळावेत म्हणून राज्यभरातून हजारोंच्या संख्येने गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात. त्यांचा भ्रमनिरास होता कामा नये, इतकी काळजी घेतल्यास सध्यातरी तितकेच पुरेसे आहे.

खासगी रुग्णालयातील उपचारांचे अवाच्या सवा दर परवडत नाहीत म्हणून सर्वसामान्य घरातील रुग्ण महापालिकेच्या तथा शासकीय रुग्णालयांचा रस्ता धरतो. तेथे गेल्यानंतर कमीतकमी पैशात चांगले उपचार मिळतील, असा विश्वास त्याला वाटत असतो. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर त्याचा हमखास भ्रमनिरास होतो. खासगी रुग्णालयांमध्ये होणारी लूट जीवघेणी असते. तर, शासकीय रुग्णालयांच्या नियोजनशून्य कारभाराचे दुखणे मारक असते. पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची (वायसीएम) परिस्थिती फारशी वेगळी नाही. पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या प्रा. रामकृष्ण मोरे यांनी दूरदृष्टी ठेवून ‘वायसीएम’ रुग्णालयाची उभारणी केली. सुरुवातीला प्रखर टीका आणि तीव्र विरोध झाला, मात्र रुग्णालयाची उपयुक्तता नंतरच्या काळात उत्तरोत्तर सिद्ध झाली. राज्यभरातील गोरगरीब रुग्णांचा आधार म्हणून यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे पाहिले जात होते. प्रारंभीच्या काळात अनेक डॉक्टरांनी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने चव्हाण रुग्णालयाची चांगली प्रतिमा तयार केली. जवळपास ७५० खाटांच्या या रुग्णालयाने बरीच वर्षे तो नावलौकिक राखलाही होता. अलीकडच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ‘वायसीएम’ म्हणजे नियोजनशून्य कारभार आणि रुग्णांचे हाल, समस्यांचे माहेरघर म्हणजे ‘वायसीएम’ असे चित्र निर्माण झाले आहे.

हजारो रुग्ण अवलंबून असणाऱ्या भल्या मोठय़ा चव्हाण रुग्णालयात सातत्याने भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरून रुग्णालय प्रशासन पर्यायाने महापालिका कायम टीकेचे लक्ष्य बनते. स्थायी समितीची बैठक असो की पालिका सभा, येथील समस्यांवरून अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना फैलावर घेतले गेले. रुग्णालयातील भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. त्यामुळे येथील प्रश्न माहिती नाहीत असा एखादा नगरसेवक नसेल आणि अधिकारीही नसेल. मात्र, तरीही चव्हाण रुग्णालयासह इतरही रुग्णालयांचे प्रश्न आजपर्यंत ‘जैसे थे’ आहेत. कोटय़वधी रुपये रुग्णालयीन कामांसाठी खर्च होतात, मात्र रुग्णांना अपेक्षित वैद्यकीय सेवा मिळत नाही. या रुग्णालयाच्या जोरावर नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार, पुरवठादार अशा कित्येकांनी आपापली घरे भरली. मात्र, रुग्णसेवेची ओरड कालही होती आणि आजही आहे. पिंपरी पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही.

नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी सर्वाना आरोग्य-वैद्यकीय विभागातील प्रश्नांची जाण आहे. मात्र, त्यांच्याकडून ठोस कृती होत नाही. या उलट, संगनमताने ‘खाबूगिरी’ सुरू झाल्याची शंका व्यक्त होऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी, चव्हाण रुग्णालयाचे प्रश्न समजून घेण्यासाठी नुकताच पाहणी दौरा केला. सर्व विभागांची त्यांनी इत्थंभूत माहिती घेतली. रुग्णांशी तसेच त्यांच्या नातेवाइकांशी चर्चा केली. त्यातून नेहमीचेच मुद्दे नव्याने पुढे आले. रुग्णालय प्रशासनाकडे कसलेही नियोजन नाही, त्याचा फटका रुग्णालय सेवेला बसतो आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांना वेठीस धरण्याचे काम होत आहे. ओळख असल्याशिवाय चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही. रुग्णालयात अपुरे कर्मचारी आहेत. चांगले डॉक्टर येण्यास उत्सुक नाहीत. औषधांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. बाहेरून औषधे आणायला सांगितले जाते. अतिदक्षता विभागात कधीही जागा उपलब्ध होत नाही. येथील डॉक्टरांचे तसेच अधिकाऱ्यांचे खासगी रुग्णालयांशी साटेलोटे आहे. शस्त्रक्रिया वेळेत होत नाहीत, कर्मचारी उद्धट वर्तन करतात, डॉक्टर जागेवर नसतात, नियोजन नसल्याने प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी असते, रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुयोग्य जागा नाही, वाहनतळ अपुरे पडते, सुरक्षिततेच्या बाबींकडे दुर्लक्ष होते, अशा अनेक समस्यांची पवारांना पुन्हा उजळणी झाली. त्यावरून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यानंतर मात्र, पुढे काहीच झाले नाही. पवारांनी प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी केली, की यामागे त्यांचा आणखी काही हेतू आहे का, अशी शंकाही उपस्थित केली जाते. सर्व प्रश्नांची माहिती त्यांनी घेतली आहे. सत्ता त्यांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे आता त्यांनी ठोस कृती करावी, उगीचच चमकोगिरी करून उपयोग नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader