बोलताना आपण भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतो. मात्र, असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षा मराठी भाषा व्याकरणाच्या सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनी व्यक्त केली.
‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ या साहित्यनिर्मितीशी संबंधित सर्वानाच उपयुक्त ठरतील अशा पुस्तकांच्या लेखिका प्रा. यास्मिन शेख या रविवारी (२१ जून) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रा. श्री. म. माटे यांची लाडकी विद्यार्थिनी असा लौकिक असलेल्या यास्मिन शेख यांना व्यासंगी संपादक श्री. पु. भागवत आणि ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांचा सहवास लाभला. मोठी कन्या डॉ. शमा आणि धाकटी प्रा. रुकसाना या दोघीही प्रेमाने सांभाळण्यास तयार असतानाही स्वावलंबन हा गुण असलेल्या यास्मिन शेख या औंध येथे एकटय़ाच राहतात.
प्रा. शेख म्हणाल्या, आपली मराठी भाषा समृद्ध आहे. ती अधिकाधिक समृद्ध करणे ही लेखकांची जबाबदारी आहे. परकीय शब्दांच्या अतिरिक्त वापराने मराठी लेखनाचे अपरिमित नुकसान होत आहे. अन्य भाषांच्या गैरवाजवी मिश्रणाने प्रदूषित झालेली भाषा टाळून प्रयत्नपूर्वक मराठी शब्दांचा वापर केला, तर आपल्या भाषेचा गौरव केल्यासारखे होईल. ‘बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही,’ असे म्हटले जाते. त्यामुळे बोलताना त्यामध्ये बोली किंवा परकीय भाषेतील शब्दांचा वापर आपण करतो. पण, लेखनामध्ये प्रमाण भाषाच वापरली पाहिजे. साहित्यनिर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचे लेखन करायचे असेल, तर त्यासाठी प्रमाण भाषेला पर्याय नाही. मराठी भाषा अभिजात व्हावी हा आग्रह धरताना भाषेचा अभिजातपणा टिकविणे ही आपलीच जबाबदारी आहे.