काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा युवा काँग्रेसच्या वतीने ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत मोफत मार्गदर्शनपर संवाद शिबिर होणार आहे, अशी माहिती युवा काँग्रेसचे सचिव नरेंद्र बनसोडे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने वाढ होत असून कुशल कर्मचाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात गरज भासते आहे. शहरात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. त्या रोजगाराची व्याप्ती युवकांपर्यंत पोहोचावी व युवांना आपले भवितव्य यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे सुयोग्य मार्गदर्शन मिळावे. मनमोकळ्या संवादाद्वारे विद्यार्थी या क्षेत्रांशी निगडित कारकीर्द घडण्यासाठी समक्ष व्हावेत, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केल्याचे बनसोडेंनी सांगितले. शिबिरात कला, वणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, अभिनय, रिटेल मॅनेजमेंट, रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, अभियांत्रिकी, संरक्षण विभाग, पत्रकारिता, कृषी, स्पर्धा परीक्षा, माहिती तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील करिअरच्या वाटा व संधी याबद्दल समुपदेशन करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी १६ ते २५ वयोगटाची मर्यादा असून  २२ ते २९ मे पर्यंत मुदत आहे. अधिक माहितीसाठी ९८६०१७७१७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

Story img Loader