पुणे : महिलेला डांबून पैसे उकळणाऱ्या सावकारांच्या विरोधात चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.शुभम धनंजय जाधव (वय २३, रा. आंबेडकर वसाहत, बारामती), आशिष अशोक गायकवाड (रा. मुंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाने जाधव आणि गायकवाड यांच्याकडून प्रतिमहा दहा टक्के व्याजाने वीस हजार रुपये घेतले होते. व्याज तसेच मुद्दल मिळून तरुणाने आरोपींना ३२ हजार ५०० रुपये दिले होते.
हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर वर्तुळाकार मार्ग उपयुक्त ठरेल ; नितीन गडकरी
त्यानंतर आरोपींनी पैशांसाठी तरुणाला धमकावण्यास सुरुवात केली. तक्रारदार तरुणाच्या पत्नीला बोलावून घेतले. वडगाव शेरीतील साईनाथनगर परिसरातील आरोपींनी त्यांच्या कार्यालयात तरुणाच्या पत्नीला डांबून ठेवले. तरुणाला धमकावून तातडीने पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने आरोपींना २० हजार रुपये पाठविले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदार तरुणाच्या पत्नीला सोडून दिले. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोलांडे तपास करत आहेत.