पिंपरी पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांवरून मोठे अर्थकारण रंगले आहे. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करण्यासाठी २५ हजार रुपयांपासून पुढे ‘भाव’ फुटल्याचे सांगण्यात येते. महापालिकेने बदल्यांसदर्भात स्वत:च निश्चित केलेल्या नियमांना तिलांजली दिली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात पालिकेने कानावर हात ठेवले असून सर्व आरोप फेटाळले आहेत.

पिंपरी पालिकेतील शिक्षण विभागाअंतर्गत प्राथमिक (पहिली ते सातवी) व माध्यमिक (आठवी ते दहावी) विभागाअंतर्गत शाळांची विभागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेत शिक्षकांच्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. प्राथमिक विभागाच्या २५० आणि माध्यमिक विभागाच्या ६५ बदल्या करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. मनासारखी बदली मिळावी किंवा आहे तेथून बदली होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिक्षकांकडून पैशांची मागणी होत आहे. काही शिक्षक स्वत:हून पैसे देऊन बदली करून घेण्यास उत्सुक आहेत. शिक्षण विभागातील विशिष्ट व्यक्तीला भेटून पैसे दिल्यास हमखास मनासारखी बदली करून मिळेल, असे निरोप इच्छुक शिक्षकांना दिले जात आहेत.

महापालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बदल्यांबाबत धोरण निश्चित केले. त्याचा आधार घेत शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी, ८ मार्च २०२२ ला परिपत्रक काढले होते. जे शिक्षक एप्रिल व मे महिन्यात बदलीस पात्र ठरतात, त्यांचे बदल्यांचे अर्ज ३१ मार्चपर्यत देणे अपेक्षित आहे. यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. कोणत्याही कारणास्तव मार्चव्यतिरिक्त बदल्या होणार नाहीत. पात्र बदल्या फक्त एप्रिल व मे महिन्यात करण्यात येतील. ऑनलाइन पध्दतीनेच बदल्या करण्यात येतील, असे विविध नियम महापालिकेने केले. ते सर्व नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे प्रस्तावित आहेत. प्राथमिक विभागाच्या २५० व माध्यमिक विभागाच्या ६५ बदल्या करण्यात येणार आहेत. नऊ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्यांची बदली प्राधान्याने करण्यात येणार आहे. याशिवाय, दिव्यांग तथा वैद्यकीय कारणास्तव बदल्या करण्यात येणार आहेत. बदल्यांची प्रक्रिया नियमानुसारच होत आहे. बदल्यांमध्ये पैसे घेतले जात नाहीत. असे काही होत असल्यास आपल्यापर्यंत त्याची माहिती कळवावी, योग्य ती कारवाई केली जाईल.- संदीप खोत, उपआयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी पालिका