संकल्पनांचे विश्लेषण करण्याची पद्धत जॉर्ज एडवर्ड मूर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने नव्याने समजावून दिली. त्या अर्थाने जनसामान्य तात्त्विक विश्लेषणापासून दूर असतात आणि मग संकल्पनांचे धोपटपाठ रूढ होतात..
विश्लेषण म्हणजे पृथक्करण. एखादी वस्तू एकापेक्षा अधिक घटकांची, अवयवांची किंवा भागांची असेल तर त्या वस्तूतील या तीन गोष्टींना वेगळे (पृथक् ) करण्याची प्रक्रिया म्हणजे विश्लेषण. विश्लेषण अनेक रीतीने करता येते, पण विसाव्या शतकात जॉर्ज एडवर्ड मूर (१८९३ ते १९५८) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने विश्लेषणाला तात्त्विक दृष्टिकोन दिला. विश्लेषण ही विचार करण्याची आधुनिक तात्त्विक पद्धती असू शकते, हे त्याने नव्याने सिद्ध केले. मूरने कोणता, कशाचा आणि काय विचार केला, यापेक्षा त्याने कसा विचार केलेला आहे, हे ‘मूरच्या पद्धती’चे वेगळेपण आहे.
मूरच्या मते बहुतेक तात्त्विक प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत, किंवा योग्य उत्तर सापडत नाही. याचे कारण, त्या प्रश्नाच्या द्वारे नेमके काय विचारले आहे, हेच स्पष्ट होत नाही. तसेच, त्या प्रश्नांवर वाद घालणाऱ्याच्या मनात अनेक परस्परविसंगत हेतू व अपेक्षा असतात. या प्रश्नाकडे अनेक जण आपापल्या हेतू व अपेक्षांसह पाहतात. साहजिकच त्यांना उत्तरेही त्यानुसारचीच हवी असतात. त्यामुळे सर्वमान्य उत्तर देता येत नाही. आणि मुख्य म्हणजे, त्या प्रश्नाचे खरे उत्तर असते एक- आणि आकलन होते दुसरे. मग गैरसमज होतात. परिणामी तो तात्त्विक प्रश्न अर्थहीन ठरवला जाण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून त्या प्रश्नाला सतत प्रश्न, उपप्रश्न विचारत राहून तो त्याच्या खरेपणाकडे नेला पाहिजे. त्यासाठी प्रश्नार्थक अभिवृत्ती विकसितच केली पाहिजे.
तात्त्विक विश्लेषण म्हणजे सतत प्रश्न विचारून संबंधित तात्त्विक संकल्पनेची व्याख्या देणे, तिचा अर्थ स्पष्ट करणे किंवा संदिग्धता काढून टाकणे, ती अवघड संकल्पना अन्य संकल्पनांच्या साह्य़ाने स्पष्ट करणे, अशा विविध संकल्पनांनी तयार होणाऱ्या युक्तिवादाची रचना स्पष्ट करणे होय. येथे एक काळजी घेतली पाहिजे : ज्या अवघड संकल्पनेचे विश्लेषण ज्या सोप्या संकल्पनांमध्ये करावयाचे आहे, त्या संकल्पना मूळ अवघड संकल्पनेशी समानार्थक असाव्यात, पण मूळ संकल्पनेत समाविष्ट नसाव्यात. हे सारे करणे म्हणजे संकल्पनांचे विश्लेषण करणे. म्हणून त्यास मूर ‘सांकल्पनिक विश्लेषण’ म्हणतो. तात्त्विक संकल्पनेचा अर्थ लावणे, तिच्या घटकांतील विसंगती शोधून दूर करणे, हा तात्त्विक विश्लेषणाचा हेतू .
येथे संकल्पना आणि वाक्य यांतील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. तात्त्विक विश्लेषण संकल्पनांचे असते, वाक्यांचे नसते.
‘मी भारतीय आहे’ , ‘मं भारतीय हूँ’, ‘क ंे कल्ल्िरंल्ल’ ही तीन वाक्ये आहेत, पण त्यातून व्यक्त होणारे विधान () एकच आहे, ते म्हणजे ‘माझे भारतीय असणे’.
तात्त्विक विश्लेषणाचे तीन घटक असतात. ज्याचे विश्लेषण करावयाचे तो घटक (मूळ संकल्पना ) = विश्लेष्य (Analyzandum), ज्या घटकामध्ये किंवा संकल्पनेमध्ये विश्लेषण करावयाचे तो घटक = विश्लेषक (Analysans), विश्लेष्य आणि विश्लेषक यांच्यातील संबंध आणि आंतरप्रक्रिया = विश्लेषण (Analysis).
ज्या संकल्पनेचे विश्लेषण करावयाचे (विश्लेष्य) तिला समानार्थक असलेली, पण त्या संकल्पनेत समावेश नसलेली दुसरी संकल्पना (विश्लेषक) शोधून या दुसऱ्या संकल्पनेच्या (किंवा संकल्पनांच्या) साह्याने मूळ संकल्पना स्पष्ट करावयाची असते. ते करताना मूळ विश्लेष्याला बाधा येणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे. अशा विश्लेषणाला ‘संकल्पनांचे विश्लेषण’ म्हणतात. हा तात्त्विक वैचारिक व्यवहार असतो म्हणून त्यास ‘तात्त्विक विश्लेषण’ म्हणावे, असे मूरचे मत आहे. थोडक्यात, एखाद्या संमिश्र संकल्पनेचे विश्लेषण तिच्यात गुंतलेल्या अन्य संकल्पनांमध्ये करणे, त्या संकल्पनांनी तयार होणाऱ्या युक्तिवादाची रचना स्पष्ट करणे, म्हणजे सांकल्पनिक विश्लेषण होय.
उदाहरणार्थ, ‘ ‘अ’ हा ‘ब’चा बंधू आहे’, हे विधान सकृद्दर्शनी साधे विधान दिसते. तथापि मूरच्या मते हे एक विधान नाही, तर ती एक विशिष्ट संकल्पना सांगणारी विधानांची विशिष्ट रचना आहे. म्हणजे असे की ‘बंधुत्व’ ही संकल्पना ‘अ’ व ‘ब’ या दोन व्यक्तींमध्ये वसणारी आहे. त्यामुळे या विधानाचे विश्लेषण असे : ‘अ’ हा ‘ब’चा बंधू आहे, याचा अर्थ ‘अ’ हा ‘ब’चा ‘सहोदर नर’ आहे.
आता येथे ‘सहोदर नर’ ही संकल्पना ‘बंधुत्व’ या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे. ‘सहोदर नर’ आणि ‘बंधुत्व’ या दोन स्वतंत्र व वेगळा अर्थ असणाऱ्या संकल्पना आहेत. ‘बंधुत्व’ ही व्यापक संकल्पना आहे आणि ‘सहोदर नर’ ही तिच्यापेक्षा संकुचित संकल्पना आहे. ‘बंधुत्व’ संकल्पनेत सख्खा, मावस, चुलत, मामे, आते तसेच मानलेला किंवा देशबंधू, व्यवसायबंधू इत्यादी असा कुठलाही इसम ‘बंधुत्व’ या संकल्पनेत व्यक्त होणाऱ्या नात्याने जवळ येतो. पण ‘सहोदर नर’ ही फार मर्यादित संकल्पना आहे. एकाच आईचे दोन मुलगे असा तिचा स्वतंत्र व निश्चित अर्थ. ‘बंधुत्व’ संकल्पनेत ‘सहोदर नर’ ही संकल्पना सामावलेली नाही.
आता, एखादी थोडी गुंतागुंतीची संकल्पना पाहा. उदाहरणार्थ, ‘चौकोनी वर्तुळ अस्तित्वात नसते’. या विधानाचे विश्लेषण कसे करणार? कारण या विधानात चौकोन आणि वर्तुळ या दोन घटकांची सरमिसळ करण्यात आली आहे. ते विधान असे सुचविते की, चौकोनी वर्तुळ नावाचा एक स्वतंत्र घटक आहे आणि तो अस्तित्वात नाही!
याचा अर्थ ‘अस्तित्वात आहे’ असे काहीतरी आहे आणि एवढेच नव्हे तर ‘अस्तित्वात नसणे’ असेही दुसरे काहीतरी स्वतंत्ररीत्या अस्तित्वात आहे; शिवाय या दोन्ही गोष्टी कुठेतरी एकत्र अस्तित्वात येऊ शकतात. ‘चौकोनी वर्तुळ अस्तित्वात नसते’ या विधानाचा आकार व्याकरणदृष्टय़ा योग्य असला तरी तात्त्विकदृष्टय़ा तो गोंधळ करणारा आहे. कारण एकाच विधानात दोन प्रचंड विरोधी गोष्टी आहेत. शिवाय त्या एकाच वेळी अस्तित्वात आहेत, असा दावाही आहे. ‘सोन्याचा पर्वत अस्तिवात नाही’ हे असेच विधान आहे. पर्वत आहे, सोन्याचा आहे पण तो अस्तित्वात नाही! म्हणजे काय?
पण एखादा माणूस सतत असले काही वाचत गेला, विचार करीत गेला की त्याला ही विधाने सत्य वाटू लागतात. मग कुठेतरी, ‘नसणेपणा’, अशा नावाचे काहीतरी खरेच अस्तित्वात असते, असे वाटू लागते. सोन्याचा पर्वत अस्तित्वात नसतो, निपुत्रिकांना पुत्र नसतो, प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते; अशी विधाने माहिती देतात असे वाटते. पण ती दिशाभूल करतात. म्हणूनच केवळ शब्द, कल्पना, संज्ञा, वाक्य, विधान, कथन, उद्गार, अभिव्यक्ती व ‘संकल्पना’ यात फरक करावयास शिकणे आवश्यक असते.
पक्ष, पक्षनिष्ठा, संघटना, प्रतोद, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुख्य, उपमुख्य, राज्य, सत्ता, राजकारण, समाजकारण, लोककल्याण, विकास, लोकशाही, राष्ट्रहित, धर्मनिरपेक्षता, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, समृद्धी, हक्क, कर्तव्य, विरोध, संघर्ष, शहर, गाव, देश या आणि कार्यकारणभाव, आत्मा, मन, बुद्धी, ईश्वर, अंतिम सत्य, जन्म, मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन, नरक, धर्म, धर्मसंस्था, श्रद्धा, स्त्री, पुरुष, कुटुंब या साऱ्या संकल्पनाच आहेत.
बरे, या आज केवळ संकल्पना नाहीत तर त्या समस्या बनलेल्या संकल्पना आहेत, प्रत्येकीत अनेक घटक गुंतले आहेत. त्यांचे योग्य विश्लेषण न केल्यानेच त्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या बनल्या आहेत. वंश, जात, वर्ण, िलगभेद यामुळे तर गल्लीतील गोंधळ ते जागतिक दहशतवाद उद्भवतो. धर्म संकटात आहे, धर्मवीराला स्वर्गच मिळतो, आत्मा अमर असतो, ईश्वर भक्ताला पावतो, दहाव्याला आत्मा कावळ्याच्या रूपात येतो, निवडून आल्यास आम्ही रामराज्य आणू, साहेब सांगतील तेच सत्य, अशा विधानांनी सामान्य जीवन भरलेले व भारलेले असते. पण त्यांचा अर्थ, त्यांची सत्यता याचे पुरावे दिले जात नाहीत, ती विधाने श्रद्धेच्या प्रांतात ढकलली जातात, मग ती चिकित्सेच्या पलीकडे जातात आणि त्यांचा व्यापार सुरू होतो.
बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक, बहुपक्षीय भारतात तर बटबटीत खोटय़ा राष्ट्रप्रेमाखेरीज समोर काही येत नाही आणि ते राष्ट्रप्रेमच सत्य वाटू लागते. भ्रामक शब्दांचे प्राचीन मायाजाल किंवा नवे मॅट्रिक्स आपल्याला अंकित करते. वास्तवाची जाणीव हरविते.
*लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.