– श्रीनिवास हेमाडे
विचार करण्याची वैज्ञानिक पद्धती अॅरिस्टॉटलपासून पुढे विकसित होत गेली.. हा विकास पूर्वसुरींच्या किंवा एकमेकांच्या आधारानेच झाला असे नाही.. उलट, आधीच्यांना किंवा बरोबरच्यांना खोडून काढत ही पद्धती विकसित झाली. सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रातही ही वैज्ञानिक पद्धती रुळली!
शास्त्रज्ञ ज्या रीतीने विचार करतो, संशोधन करतो आणि विज्ञानरचना करतो, ती रीती वैज्ञानिक पद्धती असते. काटेकोर अर्थाने वैज्ञानिक पद्धती ही तात्त्विक विचार पद्धती नसते; पण मानवी संस्कृतीच्या प्रारंभी धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे जन्मस्थान एकच होते. त्यामुळे प्रारंभ काळात विचार करण्याची पद्धती म्हणून वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूपसुद्धा तात्त्विक विचार करण्याची पद्धती बनली.
‘धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे जन्मस्थान एकच होते’ या विधानाचा अर्थ असा की, एखादा प्रश्न उपस्थित केला की त्यास ज्या रीतीचे उत्तर मिळेल त्या रीतीनुसार धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या तीन विचारविश्वांचा उदय होतो. जसे की विश्वाचे आणि मानवी जीवनाचे स्वरूप व या दोन्हींचा उगम, याविषयीचे प्रश्न तात्त्विक असतात. त्यांचे उत्तर तात्त्विक असेल तर तत्त्वज्ञान तयार होते, उत्तर धार्मिक असेल तर धर्म तयार होतो आणि उत्तर वैज्ञानिक असेल तर विज्ञान अस्तित्वात येते.
बटरड्र रसेलच्या म्हणण्यानुसार तात्त्विक प्रश्नाचे उत्तर निश्चित झाले तर त्याचे विज्ञान बनते. वैज्ञानिक उत्तराचा हा प्रांत बराच खुला, बदल स्वीकारणारा असतो. पण ‘संबंधित प्रश्नाला मुळातूनच निश्चित उत्तर तयार आहे’ अशी छातीठोकपणे सांगणारा दुसरा प्रांत म्हणजे ‘धर्म’ ही संस्था. निश्चित चिरस्थायी उत्तर हीच धर्मसंस्थेची गॅरंटी असल्याने ती उत्तरे कायमची बंदिस्त होतात, मग ती प्रगतिशील राहत नाहीत. या दोन्ही उत्तरांची आणि दोन्हीही ज्ञानक्षेत्रांची अतिशय सहानुभूतीने आणि प्रेमाने चिकित्सा करणे, त्यांच्या उत्तरांमध्ये सुधारणा करणे, ती जास्तीतजास्त यथार्थ व सत्य असतील, याची काळजी घेणे, यातून तत्त्वज्ञान तयार होते. पण विश्व आणि माणूस या दोघांच्या उगम व विकासाची निश्चित उत्तरे देण्याचा मक्ता धर्म घेतो; धर्म स्वतंत्रपणे धर्मसंस्था आणि धार्मिक पद्धती विकसित करतो. मग तत्त्वज्ञान, विज्ञान आणि धर्म या तिघांत ‘कोण बरोबर?’ या प्रश्नावरून धर्माचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोघांशी युद्ध होते. म्हणजेच धार्मिक पद्धती, वैज्ञानिक पद्धती आणि तत्त्वज्ञानात्मक पद्धती यांच्यात संघर्ष होतो.
ज्यास आज आपण वैज्ञानिक पद्धती म्हणतो तिची मुळे प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात आढळतात. त्यामुळे प्रारंभीचे (इ.स. पू. ६२५ ते ४८० या काळातील) ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे एका अर्थाने विश्वशास्त्रीय तत्त्वज्ञान (कॉस्मॉलॉजी) होते. या काळातील तत्त्वज्ञ खरे तर भौतिक-शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रश्न विचारले ते विश्वाविषयीचे वैज्ञानिक स्वरूपाचे होते. तथापि ‘प्रश्न उपस्थित करणे’ ही कृतीच माहीत नसण्याच्या काळात ‘प्रश्न विचारणे’ ही मूलत: तात्त्विक कृती मानली गेली. त्यामुळे ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या शास्त्रीय प्रश्नांना आणि त्यांच्या अशास्त्रीय उत्तरांना तत्त्वज्ञान हा दर्जा मिळाला. हान्स रायशेनबाख (१८९१- १९५३) या जर्मन विज्ञान तत्त्ववेत्त्याच्या मते ‘प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान म्हणजे योग्य प्रश्नांना दिलेली चुकीची उत्तरे होती.’
ज्यास वैज्ञानिक पद्धती म्हणता येईल तिचा प्रारंभ अॅरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४-३२२) केला. मूर्त, इंद्रियगोचर वस्तूंचे बनलेले विश्व हेच खरेखुरे विश्व होय, अशी अॅरिस्टॉटलची धारणा होती. वस्तूंचे व विश्वाचे स्वरूप समजून घ्यायचे, तर त्यांचे निरीक्षण करून त्यांचे गुण, त्यांचे वर्तन याविषयी विश्वसनीय माहितीचा आधार घ्यावा लागतो, असे तो समजत होता. पद्धतशीर निरीक्षण ही त्याची वैज्ञानिक संशोधन पद्धती होती. त्याचे निरीक्षण निगमन (सामान्याकडून विशिष्टाकडे जाणारे) होते. त्याचे तर्कशास्त्र निगामी होते. त्यानंतर थेट सोळाव्या शतकातच विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीचा उदय झाला, असे समजण्यात येते. पण ते योग्य नाही.
अरबी विद्वानांनीसुद्धा काहीएक विचार केला होता. ग्रीक तत्त्ववेत्त्यांपकी केवळ अॅरिस्टॉटलचा प्रभाव अरबी जगतावर पडला. अॅरिस्टॉटलचा अरबांनी ‘प्रथम आचार्य’ (द फर्स्ट मास्टर) या पदाने बहुमान केला. पण त्याच्या तर्कशास्त्रावर आणि वैज्ञानिक पद्धतीवर इब्न अल् हैथम (९६५-१०४०), अल् बेरुनी (९७३-१०४८), इब्न सिना किंवा अव्हेसिना (९८०-१०३७) या काही अरबी भौतिक-शास्त्रज्ञांनी समर्पक टीका केली. आणि अॅरिस्टॉटलच्या ‘केवळ निरीक्षण’ या पद्धतीला प्रयोगाची जोड देऊन स्वतंत्रपणे वैज्ञानिक संशोधन पद्धती विकसित केली.
एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून विज्ञानाची सुरुवात सोळाव्या शतकात युरोपमध्ये झाली. विज्ञानाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व वैज्ञानिक पद्धतीत आहे, असे मानून वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाचा विचार सुरू झाला. लॉर्ड फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६) याने खऱ्या अर्थाने आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा पाया रचला. बेकनने निगमनाऐवजी ‘विगमन’ (विशिष्टाकडून सामान्याकडे जाणारे) ही रीत आणली. म्हणूनच हान्स रायशेनबाख त्याला ‘विगमनाचा प्रेषित’ म्हणतो. गॅलिली गॅलिलिओ (१५६१-१६४२), सर आयझ्ॉक न्यूटन (१६४२-१७२७) यांसारख्या वैज्ञानिकांनी निरीक्षण व प्रयोग हे वैज्ञानिक पद्धतीचे व्यवच्छेदक स्वरूप मानले; पण त्यात गणित महत्त्वाचे ठळक केले. वैज्ञानिक पद्धतीचा विचार करणाऱ्यात कोपíनकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन, आइन्स्टाइन, इ. इ. वैज्ञानिक आणि रेने देकार्त, फ्रान्सिस बेकन, जॉन स्टय़ुअर्ट मिल, कार्ल पॉपर, टॉमस कुन्ह, इ. तत्त्ववेत्त्यांच्या मते अॅरिस्टॉटलची पद्धती नवीन शोध लावण्यासाठी उपयुक्त नाही. विसाव्या शतकात पॉपर, कुन्ह किंवा पॉल फेय्राबेंड यांच्यासह ज्यांनी ज्यांनी आपापली पद्धती मांडली ती परिपूर्ण व निर्दोष आहे, असेही नाही. या पद्धतीचे स्वरूप ठरविण्यात खूप वादविवाद झडले.
धर्म आणि विज्ञान या दोन्ही ज्ञानशाखांनी जग आणि माणूस यांचे स्वरूप ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून संस्कृतीला आकार आला. पण वैज्ञानिक पद्धती म्हणजे केवळ जग, निसर्ग समजावून घेणे नसते तर माणूस समजावून घेणे असते, त्यामुळे माणसाची वैज्ञानिक पद्धती कोणती? हा प्रचंड वादाचा विषय आहे. माणूस ज्ञाता, भोक्ता, मानवी जगाचा निर्माता असतो; पण ‘ज्ञान’ या वेगळ्या वस्तूचाही निर्माता असतो. त्याच्या या साऱ्या क्षमतांसह आणि नतिक जाणिवांसह त्याला समजावून घेणे, हीसुद्धा वैज्ञानिक पद्धतीची कार्यक्रम पत्रिका असते, हे भानच लवकर विकसित होऊ शकले नाही. भारतीय नोकरशाही तर ‘सामाजिक शास्त्रांचे’ अस्तित्वच नाकारते. त्याचा दुष्परिणाम सामाजिक संशोधनावर दिसतो.
समाजशास्त्र या नव्या ज्ञानशाखेचा सुव्यवस्थित उदय झाल्यानंतर ‘सामाजिक शास्त्रे’ या नावाचा काहीएक संशोधनाचा आणखी एक प्रांत असतो, याचे भान विचारवंतांना आले. हे भान येण्यापर्यंत समाजाचे नियंत्रण करणारे एकमेव ‘मानवशास्त्र’ होते ते ‘धर्म’ ही सामाजिक संस्था! धर्माने ‘माणूस म्हणजे कोण?’ याचे निश्चित उत्तर दिले. समाज एकत्र राखण्याचे कामही केले; पण धार्मिक शोषण भयावह ठरले. धार्मिक पद्धती ही सामाजिक पद्धती कधीही होऊ शकत नाही. विज्ञान उशिरा उदयास आले, पण ते चांगल्या-वाईटापलीकडे आहे, असे समजून त्याचा गरउपयोगही झाला. कारण समाजवैज्ञानिक पद्धती आजही वादग्रस्त आहे.
तरीही, ‘वैज्ञानिक पद्धती’ हा संशोधनाचा प्रांत इतका मूलभूत ठरला की ए. एन. व्हाइटहेड या विख्यात तत्त्वज्ञ-गणितीच्या मते, ‘वैज्ञानिक पद्धतीचा शोध हाच सर्वात मोठा शोध आहे की, ज्याशिवाय मानवी संस्कृती आणि ज्ञानविकास शक्यच झाला नसता.’
लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.