एकमेकांचे जोडीदार म्हणवणाऱ्यांना आपापली ताकद वाढल्याचे आता लक्षात येऊ लागले असेल, तर वेगळे होणे नैसर्गिकच. सत्तेतील सोयरिकीला अर्थच उरणार नसेल, तर वेगळे होणेही नैसर्गिक. तेव्हा शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही जोडय़ांनी धुसफुस वाढवण्याऐवजी वेगवेगळे लढण्याचा निर्णय करणे राज्यालाही हितकारक ठरेल..

महाराष्ट्राला गेल्या काही वर्षांत भेडसावणाऱ्या सर्व समस्या या आघाडीच्या राजकारणामुळे निर्माण झाल्या आहेत, असा सर्व राजकीय पक्षांचा दावा असतो. एकटय़ास न पेलणारे आव्हान सामुदायिकरीत्या पेलणे म्हणजे आघाडीचे राजकारण. हे म्हणजे एकल स्पर्धात सडकून मार खाणाऱ्या भारतीय टेनिसपटूंनी दुहेरी स्पर्धात बरी कामगिरी करण्यासारखेच. एकटय़ाला सामना झेपत नाही, तेव्हा साथीदारास बरोबर घेऊन तो खेळायचा हे दुहेरी स्पर्धात खपून जाते. महाराष्ट्रातही अशी दुहेरी स्पर्धा १९९५ आणि नंतर १९९९ पासून सुरू आहे. या आघाडीच्या राजकारणात सुरुवात झाली १९९५ साली. बाबरी मशीद पडल्यानंतर एकंदरच हिंदुत्व या मुद्दय़ाचा साक्षात्कार शिवसेनेला झाला आणि भाजपलाही आपल्याला रस्त्यावरचे राजकारण करू शकेल असा एखादा दांडगट भाऊ हवा अशी जाणीव झाली. तोपर्यंत भाजप हा बौद्धिके घेणाऱ्या-देणाऱ्यांचा पक्ष होता आणि शिवसेनेस कोणत्याच बौद्धिकाशी दूरान्वयानेही काही देणे-घेणे नव्हते. त्यामुळे हा परस्परसंयोग झाला आणि ही कथित युती जन्माला आली. नवीन जन्माला येणारे पोर संसाराला लागले की वेगळे होणार हे जसे नक्की आणि नैसर्गिक असते तसेच आज ना उद्या या युतीला आपापले संसार वेगळे थाटावेच लागतील हे स्पष्ट होते. वैयक्तिक आयुष्यात हा वेगळे होण्याचा क्षण अनेकांच्या बाबत वयाच्या पंचविशीत येतो. तेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या बाबतही तो पंचवीस वर्षांनी आला असेल तर ते कालानुरूपच झाले, असे म्हणावे लागेल. तेव्हा उगाच पंचवीस वर्षे आपण एकत्र राहिलो वगैरे असे गळे काढण्याचे कोणालाच कारण नाही. त्याची गरजही नाही. याचे कारण हे पक्ष इतकी वर्षे एकत्र राहिले ते उभयतांची गरज होती म्हणून. ही गरज स्वत:च्या पायावर उभी राहण्याच्या क्षमतेवर जोपर्यंत मात करीत होती तोपर्यंत ही युती सुरळीत राहिली. नंतर जुन्या झालेल्या दरवाजे-खिडक्यांच्या बिजागऱ्यांनी कुरकुर करावी तशी युतीच्या सांध्यांनीही बंडखोरी सुरू केली. राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर चारच वर्षांनी समोरच्या काँग्रेस परिवारात दुफळी माजली आणि १९९९ साली शरद पवार यांनी आपली राष्ट्रवादीची चूल वेगळी मांडायला सुरुवात केली. पवारांचे चातुर्य हे की त्यांनी आपली चूल वेगळी मांडली तरी काँग्रेसची पंगत मात्र सोडली नाही. म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचा मुदपाकखाना वेगळा होता. परंतु त्यांचा आणि काँग्रेसचा भोजन कक्ष मात्र एकच होता. तेव्हा राष्ट्रवादी मंडळी आपापला शिधा घेऊन काँग्रेसच्याच मंडपात त्यांच्या मांडीला मांडी लावून भोजनास बसत. त्यालाही आता १६ वर्षे लोटली. तेव्हा काँग्रेसला आता या पंगती-प्रपंचाचा कंटाळा आला असून आपल्या भोजन कक्षात किती काळ इतरांना सामावून घ्यायचे असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. मुदलात मूळच्या काँग्रेसजनांनाच शिधा कमी पडू लागला असून हे राष्ट्रवादीवाले आपल्या शिध्यावर हात मारत असल्याची भावना काँग्रेसजनांच्या मनी दाटून येऊ लागली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादीलादेखील थारेपालटाची गरज वाटू लागली असून किती काळ एका अन्नछत्रात काढायचा असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाया ग्रामीण. गावाकडे सडकून कष्टाची सवय असल्यामुळे मुले लवकर मोठी दिसू लागतात. त्याचमुळे शिवसेना-भाजपला वेगळे होण्याची गरज वाटण्यासाठी २५ वर्षे लागली तर त्याच वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मात्र १६ व्या वर्षीच या भावनेची जाणीव झाली. जे होत आहे ते नैसर्गिकच म्हणावे लागेल.    
कारण वाढीसाठी प्रत्येकाला स्वत:चा म्हणून एक अवकाश लागतो. मग ती व्यक्ती असो वा व्यक्तींचा बनलेला राजकीय पक्ष. ऐतिहासिकदृष्टय़ा भाजप आणि शिवसेना या पक्षांनी महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघांची ११७ आणि १७१ अशी विभागणी केली. त्यामागील विचार हा की महाराष्ट्रात सेना जास्त जागा लढवील तर लोकसभेत ४८ पैकी २६ ठिकाणी भाजप तर उर्वरित जागी सेना उमेदवार लढतील. परंतु राजकारण हे कधीही इतके गोळीबंद असू शकत नाही. कारण ते परिस्थितीनुसार बदलते. तेव्हा सेना आणि भाजप यांच्यातील ही परिस्थिती दोन कारणांमुळे बदलली. नरेंद्र मोदी यांचा उदय आणि त्याच वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. त्याआधी सेनाप्रमुखांच्या उतरत्या वयामुळे त्यांच्या सेनेचा दराराही जनतेस वाटेनासा झाला. याचा परिणाम म्हणून सेनेच्या विजयाचे प्रमाणही घसरत गेले. मोदी यांच्या रूपाने भाजपस राष्ट्रीय पातळीवर अस्सल हिंदुहृदयसम्राट मिळाल्यापासून त्यांना सेनेच्या अन्य ग्रामसिंहांची गरज वाटेनाशी झाली. तेव्हा अशा वेळी भाजपने मूळच्या समीकरणात बदल करण्याची मागणी केल्यास ते योग्यच म्हणावयास हवे. हे अर्थातच सेनेस मान्य नाही. कारण मुळात मोदी यांच्या रूपाने आलेला हिंदुहृदयसम्राटच त्यांना अमान्य असल्यामुळे त्यावर आधारित युक्तिवादही मान्य नसणे साहजिकच. त्यात या पक्षास अलीकडच्या लोकसभा निवडणुकांत घवघवीत यश मिळाले. वास्तविक हे यश मोदी यांचे. पण ते आपलेच असा भास सेनेस होऊ लागला आणि भाजप आणि त्या पक्षातील संबंध तणावाचे होत गेले.    
तिकडे त्याच वेळी अशीच काहीशी परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होत गेली. राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय वारू फुरफुरू लागत असताना काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भरवशाची म्हैस एकापाठोपाठ एक अपयशांचे टोणगेच प्रसवत राहिली. तेव्हा सत्तेचा झरा अशा परिस्थितीत आटणार याची जाणीव चाणाक्ष राष्ट्रवादीला आधीच झाली. गेल्या पंधरा वर्षांची या पक्षांची सत्ता. ती जाणार हे दिसू लागल्यावर उभयतांचा एकमेकांच्या शय्यासोबतीतील रसच निघून गेला. त्यामुळे त्या आघाडीवरही वेगळे होण्याची भाषा सुरू झाली आहे. या दोन्ही जोडीदारांना आता एकमेकांच्या साहचर्यातून काहीही मिळणार नाही. त्याच वेळी त्यांना जे गमवावे लागणार आहे ते हे पक्ष एकत्र राहिले काय किंवा विभक्त झाले काय त्यांच्या हातून जाणारच आहे. तेव्हा त्या आघाडीवरही धुसफुस सुरू झाली असेल तर ते नैसर्गिकच म्हणावयास हवे. आता मुद्दा आहे तो या घटस्फोटाचे पाप कोणी आपल्या माथ्यावर घ्यायचे हा. विवाहाची गाठ बांधण्याचे श्रेय घेण्यास अनेक तयार असतात. परंतु आपल्यामुळे संबंध तुटले हे सांगण्याचे धारिष्टय़ आणि प्रामाणिकपणा फार जणांकडे नसतो. विद्यमान राजकीय परिस्थितीत याचाच प्रत्यय येत आहे. शिवसेना नेते विसंवादासाठी भाजपस जबाबदार धरताना दिसतात तर भाजप नेत्यांच्या मते सेना नेत्यांच्या बालिश वर्तनामुळे युतीवर विघटनाची वेळ आली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही हेच सुरू आहे. आपल्यापेक्षा आपला जोडीदार घटस्फोटाचे कारण आहे, हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आणि राष्ट्रवादी मग्न आहेत.    
परंतु तो आभास असेल. तो करण्याऐवजी या दोन्ही जोडय़ांनी काडीमोड घ्यावा आणि आपले जे काही असेल ते सत्त्व पणास लावावे. आपल्या अवस्थेविषयी सतत जोडीदारास बोल लावण्याऐवजी वेगळे होणे या पक्षांसाठी.. आणि राज्यासाठीही.. अधिक हितकारक आहे. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य कधीही बरे.