बौद्ध धर्म हा शांतताप्रिय आहे, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पण या पुस्तकातले दाखले पाहिले की, या समजाला मोठमोठे तडे जातात. हा धर्मही ख्रिश्चन, इस्लाम या धर्माइतकाच हिंसक आहे, असं वाटायला लागतं. पण बौद्ध धर्म आणि हिंसा या प्रश्नावर एक सार्वत्रिक शांतता आहे. त्या शांततेचा भंग करणारं हे पुस्तक आहे. सुदैवाने चार पावलं मागे यायला लागेल इतकं क्षीण समाजमन मायकेलच्या आसपास नाही. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकलं, बाजारात येऊ शकलं आणि आपल्यापर्यंतही पोहचू शकलं.

एखादा धर्मच कधी हिंसा करा..याला मारा..त्याला ठार करा..असा संदेश देतो का? विशिष्ट रंगातून धर्माकडे पाहायची सवय झालेल्यांकडे या प्रश्नावर उत्तर असेलही. पण ते खरं नाही. वास्तवात कोणताच धर्म हिंसेचं तत्त्वज्ञान मांडत नाही. आता खरं आहे. म्हणजे हिंसा हा एखाद्या धर्माचा पाया असू शकत नाही. हे एकदा मान्य केलं की याच्या बरोबर उलटं विधानही मान्य करावं लागेल. ते म्हणजे एखादा धर्म फक्त आणि फक्त शांततावादीच आहे.
हा मुद्दा बौद्ध धर्माच्या अनुषंगानं आहे. निमित्त आहे एका जबरदस्त पुस्तकाचं. ‘बुद्धिस्ट वॉरफेअर’ हे त्याचं नाव. सरळ सरळ भाषांतर केलं तर ‘बौद्धांचं युद्धतंत्र’ असं म्हणता येऊ शकेल. असं काही पुस्तक आहे, ते कसं कळलं ते पण महत्त्वाचं आहे. झालं असं की थायलंड, म्यानमार अशा दक्षिण आशियाई देशांतील दंगलींच्या, जाळपोळीच्या बातम्या जूनच्या आसपास बऱ्याच येत होत्या. पण त्याचं कारण काही तितकंसं नीट कळत नव्हतं. थोडं खोलात गेल्यावर कळलं त्या त्या देशांतील बौद्धधर्मीय आणि इस्लामी यांच्यात मोठय़ा प्रमाणावर संघर्ष सुरू आहे. त्याची अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न करत होतो तर तेवढय़ात ‘टाइम’चा अंक हाती आला. जूनच्या दुसऱ्या आठवडय़ातील या अंकाच्या मुख्यपृष्ठावर एका बौद्ध भिख्खूचं छायाचित्र आहे. त्यांचं नाव अशिन विराथु. म्यानमारचे आहेत ते. ते तितकंसं महत्त्वाचं नाही. अतिमहत्त्वाचं आहे ते मुखपृष्ठावरचं शीर्षक : द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर.
हे असं काही ऐकायची वा वाचायची सवय नसते आपल्याला. बौद्धांचा दहशतवाद? त्यामुळे ते वाचून डोळे जरा दिपलेच. वाटलं आता मागणी येईल ‘टाइम’वर बंदी घाला वगैरे. तसं काही झालं नाही. तेव्हा त्या वेळी हे सगळं एका अभ्यासू मित्राशी बोलत होतो. तर तो म्हणाला पुस्तकच वाच. तेच हे ‘बुद्धिस्ट वॉरफेअर’.
सर्वसाधारणपणे आपला समज असा की बौद्ध धर्म हा शांतताप्रेमी.. खरं तर शांततावादीच आहे.. ते कधीही हिंसाचार करीत नाहीत. मनातसुद्धा हिंसक विचारांस थारा देत नाहीत. त्यात आपण सध्याच्या दलाई लामांना पाहत असतो. त्यांचे ते हसरे डोळे आणि मायभूमीसाठी सुरू असलेला संघर्ष वगैरेमुळे आपली सहानुभूती त्यांच्या बाजूने असते. या आणि अशा कारणांमुळे एकंदरच हा धर्म फक्त कट्टर शांततावाद्यांचाच अशी आपली खात्री झालेली असते.
हे पुस्तक आपल्याला खडबडून जागं करतं. मायकेल जेरिसन आणि मार्क जर्गनस्मेयर या दोघांनी ते संपादित केलेलं आहे. मायेकल अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या यंगस्टन विद्यापीठात धर्मशास्त्र शिकवतो. त्यातही बौद्धधर्मीयांची हिंसा हा त्याचा खास अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी तो जगभर हिंडत असतो. या पुस्तकासाठीही त्यानं भरपूर पायपीट केली. ती दिसतेच आहे पुस्तकात. त्याचा जोडीदार मार्क हादेखील अध्यापनाच्याच कामात आहे. पण कॅलिफोर्निया विद्यापीठात. धर्म आणि हिंसा हा त्याच्याही अभ्यासाचा विषय आहे. १९९३ साली जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पहिला हल्ला झाला होता तेव्हा या हल्लेखोरांचा धर्मविचार जाणून घेण्यासाठी त्याने त्यातील सर्व आरोपींच्या, हमास या संघटनेतील अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावर आधारित असं स्वतंत्र पुस्तकही त्यानं लिहिलं. ‘बुद्धिस्ट वॉरफेअर’मध्ये मात्र त्यांनी संबंधित विषयावर आठ जणांच्या निबंधाचं संकलन केलं आहे. बुद्धोलॉजी, जपानी संस्कृती अभ्यासक, हॉवर्ड विद्यापीठातले धर्माभ्यासक, ऑक्सफर्ड विद्यापीठात बौद्ध धर्मावर अध्यापन करणारे..असे अनेक ठिकठिकाणच्या अभ्यासकांना त्यांनी या पुस्तकासाठी लिहितं केलंय.  बौद्धधर्मीय आणि युद्ध, आर्य बोधिसत्त्व आणि युद्धतंत्रज्ञान, पाचव्या दलाई लामांचा धार्मिक हिंसाचार, मंगोलियात बौद्धांनी हिंसाचारास दिलेली मान्यता, जपानमधील सैनिक झेन संकल्पनेचा अभ्यास, कोरियन युद्धात चीनमधील बौद्ध, बौद्ध सैनिक आणि बौद्ध धर्माचे लष्करीकरण अशा आठ व्यापक विषयांवर विस्तृत निबंध या पुस्तकात आहेत. पुस्तकाचं केंद्र नक्की असल्यानं सगळ्यांचंच लेखन आखीव-रेखीव आहे. शैली बरीचशी ‘इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकातल्या लेखनासारखी. सोपी आणि सरळ.. उगाच आपल्याकडे कशी.. यासंबंधी विचार करायचा झाला तर असे म्हणता येईल की..वगैरे पाल्हाळं लावली जातात तसं अजिबात नाही. उदाहरणार्थ मायकेल जेरिसनची प्रस्तावना. ‘हिंसा ही सर्वच धर्मपरंपरांचा भाग आहे आणि बौद्ध धर्म त्यास अपवाद नाही,’ असं थेट अर्थाला हात घालणारं लिखाण. त्यामुळे पुस्तक अभ्यासू असूनही रंजकतेपासून फारकत घेत नाही. त्याच वेळी विषय नवीन असल्यामुळे बऱ्याचदा त्यातील तपशिलामुळे थक्क व्हायला होतं.
उदाहरणार्थ जपानमध्ये इसवी सनाच्या पाचव्या शतकात जेव्हा सामाजिक कारणांनी हिंसाचार झाला तेव्हा हिंसेला बौद्ध धर्मानंच उत्तेजन दिलं. म्हणजे एकानं विरोधी गटाच्या एकाला ठार केलं तर तो बोधिसत्त्व अवस्थेची पहिली पायरी चढला, असं अधिकृतपणे सांगितलं जात होतं. आणि जो जितक्या जास्त जणांना ठार करेल तितका तो संतत्वास पोचेल, अशी शिकवण होती. खरा गंभीर प्रकार पुढेच आहे. प्रत्यक्षात खरोखरच असा निर्घृण हिंसाचार व्हावा यासाठी संबंधितांना चिक्कार दारू पाजली जायची. इतकी की बापलेक एकमेकांना ओळखायचे नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यातसुद्धा मारामाऱ्या व्हायच्या.
इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर बौद्ध धर्मगुरूंनी हिंसाचाराचा पुरस्कार केल्याचे अनेक दाखले पुस्तकात आढळतात. थायलंडमध्ये सत्तरच्या दशकात कम्युनिस्टांबरोबरील राजकीय लढय़ात हिंसाचाराचा आग्रह धरला तो बौद्ध भिख्खूनीच..इतका की कम्युनिस्टांना ठार करण्यात बौद्ध धर्म अजिबात आड येत नाही, अशी उलट त्यांनी तरफदारी केली. अगदी o्रीलंकेत तामिळींच्या विरोधात लष्करानं कठोरातील कठोरपणे कारवाई सुरू करावी यासाठी वालपोला राहुला या बौद्ध भिख्खू नेत्यानंच आग्रह धरला होता. त्याच वेळी सध्याच्या म्यानमार, थायलंड आदी देशांत अनेक बौद्ध भिख्खू आपल्या पारंपरिक लालपिवळ्या पायघोळ धर्मवेशात शस्त्रास्त्रे लपवून कशी आणतात, स्थानिक मुस्लीम गोळीबार करतात, त्याचाही तपशील इथे आढळतो.
इतिहासाची, आणि वर्तमानाचीही अनेक अंगं असतात. ती तपासून बघण्याची सांस्कृतिक सवय आणि बौद्धिक शिस्त आपण लावून घेतलेली नाही. आणि आता तर ते शक्यही वाटत नाही. त्यामुळे या पुस्तकाची प्रस्तावना वाचायला सुरुवात केल्यापासूनच समाधान मिळायला सुरुवात होते. बौद्ध धर्म आणि हिंसा या प्रश्नावर एक सार्वत्रिक शांतता आहे, अभ्यासकांच्या पातळीवर तरी तिचा भंग व्हावा आणि याही अंगाने या विषयाकडे पाहायला सुरुवात व्हावी या उद्देशानं आपण हे संपादन करीत आहोत, असं या दोघांनी म्हटलंय.
सुसंस्कृत, बुद्धिनिष्ठ समाजव्यवस्थेसाठी अशी चिकित्सा होणं आवश्यकच आहे. अर्थात हे वाटतं तितकं सोपं नसतंही. मायकेलला याचा अनुभव आलाच. या विषयावर तो पुस्तक करतोय असं जाहीर झाल्यावर त्याच्यावर ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हस्तक असल्याचा आरोप झाला, तो ठरवून बौद्ध धर्मास बदनाम करतोय असं बोललं गेलं. पण या असल्या टीकेमुळे चार पावलं मागे यायला लागेल इतकं क्षीण समाजमन मायकेलच्या आसपास सुदैवाने नाही.
अर्थात चांगलंच आहे ते. त्यामुळे तरी अशी महत्त्वाची कामं उभी राहतात.
आपण निदान ती वाचायला तरी हवीत.

decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Image of Walmik Karad And Jitendra Awhad
Walmik Karad : “तो अजूनही तिथेच बसला आहे…” वाल्मिक कराडवरील मकोका आणि परळी बंदवर जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात

बुद्धिस्ट वॉरफेअर : मायकेल जेरीसन आणि
मार्क जर्गनस्मेयर,
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस,
पृष्ठे : २५४, किंमत : ६४५ रुपये.

Story img Loader