नुकत्याच निधन पावलेल्या डोरिस लेसिंग या नोबेल विजेत्या ब्रिटिश लेखिकेला दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील वर्ष, पहिल्या महायुद्धाचं तांडव आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं वाटे. एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणाऱ्या लेसिंग मानवी जीवनाबद्दल आस्थेनं आणि सकारात्मकतेनं लिहीत.
‘लेखन हा माझा श्वास आहे आणि त्यामुळे त्याशिवाय जगणं मला अशक्य आहे,’ असं एकीकडे गंभीरपणे म्हणत दुसरीकडे ‘लेखनाची माझी ही जित्याची खोड मेल्यावरही जाणार नाही, माझ्या थडग्यावरही मी काही तरी खरडेन’ अशी मिस्कील पुस्ती जोडत जाणाऱ्या नोबेलविजेत्या ब्रिटिश लेखिका डोरिस लेसिंग यांचं १७ नोव्हेंबर रोजी निधन झालं. जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या लेखिकेच्या निधनानं हळहळ तर वाटली असेलच, पण तिनं वाचकांसाठी मागे ठेवलेल्या दर्जेदार साहित्याची सोबत आहे असं समाधानही असेल. लेसिंग यांच्या कारकिर्दीत त्यांच्या नावावर साठेक पुस्तकं आणि विविध पुरस्कार असूनही तिला नोबेल मात्र वयाच्या ८८व्या वर्षी मिळालं. तेव्हा लेसिंग यांच्या काहीशा वळणावळणाच्या, टीका, चर्चा यांनी युक्त अशा जीवनप्रवासाशी ही बाब सुसंगत आहे असं त्यांच्या हितचिंतकांचं म्हणणं होतं.
लेसिंग आणि ‘गोल्डन नोटबुक’ असं समीकरण वाचकांच्या मनात इतकं पक्कं आहे की, त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा याच पुस्तकाचा निर्देश नोबेल समितीनं केला. १९६२ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला पन्नास र्वष झाली तरी तिची वाचकप्रियता इतकी आहे की प्रत्येक पिढीला ती आपलीच गोष्ट वाटते. समकालीन लेखनात लेसिंगचं सामथ्र्य यात प्रकर्षांनं जाणवतं. वाचकाशी नाळ जोडणारं असं वास्तववादी लेखन करणाऱ्या लेसिंगनं स्वयंशिक्षणातूनच आपलं वाङ्मयीन व्यक्तित्व घडवलं. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकून अभिजात साहित्याच्या मदतीनं तिनं आपल्या मनाची मशागत केली. दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील र्वष, पहिल्या महायुद्धाच्या तांडवाचा आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं तिला वाटे. ऱ्होडेशियातील ब्रिटिश वसाहतींमध्ये दिसणाऱ्या वसाहतवादी जीवनाचा, वर्णभेदमूलक तीव्र संघर्षांचा व जाणवणाऱ्या आर्थिक दरीचा विलक्षण परिणाम तिच्या मनावर झाला. त्यामुळेच वयाच्या ९४ वर्षांपैकी ६४ र्वष ब्रिटनमध्ये घालवूनही तिच्या मनोविश्वाचं केंद्रस्थान ती पहिली तीस वर्षेच राहिली आणि विविध प्रकारे तिच्या लेखनातून त्या अनुभवांचा आविष्कार होत राहिला.
स्वानुभवातून चुका सुधारत राहण्यानं, स्वयंशिक्षण, स्वयंमार्गदर्शन करत राहिल्यानं तिची किती तरी मतं वेगळी, वैशिष्टय़पूर्ण ठरली. स्वतंत्र विचार व वृत्ती, परखड भाष्य आणि जीवनाबद्दलचं लसलसतं, जिवंत कुतूहल यामुळे तिचं लेखन आगळं, ताजं, उत्स्फूर्त वाटत राहिलं.
लहानपणी आपल्यात कोणतीच क्षमता नसल्याची जाणीव इतरेजन करून देत राहिल्यानं आपण वैफल्यग्रस्त झालो आणि म्हणून लेखनाकडे वळलो असं ती म्हणत असली तरी वाचन व लेखन यांची उपजतच आवड तिला होती असं तिच्या आत्मचरित्रात्मक आठवणींमधून लक्षात येतं. लेखक होण्यासाठीच आपला जन्म आहे असं मनोमन वाटत असल्यानं तिनं १८ व्या वर्षांपासूनच कादंबरीलेखनाला आरंभ केला. दोन-चार सुमार दर्जाच्या कादंबऱ्या लिहिल्यावर २६-२७ व्या वर्षी ‘द ग्रास इज सिंगिंग’ (१९५०) या कादंबरीपासून तिला सूर गवसला. या पहिल्याच प्रकाशित कादंबरीतील कथानक, पात्रचित्रण, भाषा यांचा प्रभाव वाचक, समीक्षक यांच्यावर पडला. गोरी ब्रिटिश तरुणी आणि कृष्णवर्णीय शेतमजूर यांच्यातील असफल प्रेमकहाणी व तिचा शोकपूर्ण शेवट दाखवतानाच लेसिंग स्त्रीचं भावनिक परावलंबन आणि कृष्णवर्णीयांच्या गुलामी मनोवृत्तीत घडत जाणारा बदल यांचा वेध घेताना दिसते.
त्यानंतर कथा-कादंबरी या वाङ्मय प्रकारांत तिचं बहुतेक लेखन मोडत असलं तरी आरंभी तिनं काही कविता केल्या होत्या. ‘फोर्टीन पोएम्स’ (१९५९) हा कवितासंग्रह, काही एकांकिका, नाटुकली आणि ‘इच हिज ओन वाइल्डरनेस’, ‘प्ले विथ अ टायगर’ अशी नाटकंही तिच्या नावावर आहेत. याशिवाय ‘अंडर माय स्किन’ (१९९५) व ‘वॉकिंग इन शेड’ (१९९८) हे तिच्या आत्मचरित्राचे दोन खंड प्रकाशित झाले. त्यात १९६२ पर्यंतचाच जीवनप्रवास चित्रित झाला. याशिवाय ‘आफ्रिकन लाफ्टर’ व ‘लंडन ऑब्झव्‍‌र्हर’ हे ललितसंग्रह, काही समीक्षापर व डॉक्युमेंटरीवजा लेखन यांचाही समावेश आहे.
१९५० मधील पहिल्या कादंबरीपासूनच तिच्या लेखनाची वैशिष्टय़ं कधी स्पष्टपणे, तर कधी अस्पष्टपणे दिसून येतात. तिच्या वैचारिक प्रवासाचे टप्पेही दिसतात. लेसिंगच्या वाङ्मयाचे आशयानुसार स्थूलमानानं चार भाग करता येतात- समकालीन समाजवास्तवाशी निगडित कथा-कादंबऱ्या, अवकाशविज्ञानावर आधारित कादंबऱ्या, गूढ-अध्यात्मदर्शी लेखन आणि इतर संकीर्ण लेखन. हे पाहिलं की लेखिका म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही तिचं मन किती तरी वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रमण करत होतं आणि आपल्या लेखनातून त्या अनुभवांचा धांडोळा घेत, त्यांचा अन्वयार्थ लावत ती समाजवास्तवाची विविध परिमाणं वाचकांपुढे मांडत होती. तिच्या कादंबऱ्यांमध्ये परस्परसंबंधित सूत्रं आहेत तशीच पुढच्या कादंबऱ्यांची सूचना आहे. चित्रपटांचे सीक्वेल हा प्रकार तिनं चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच आपल्या लेखनात वापरला होता. ‘गोल्डन नोटबुक’मधून मुक्त स्त्रीचं तपशीलवार वर्णन दाखवताना एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीचं चित्रण ती ‘अ‍ॅना वुल्फ’ या नायिकेच्या रूपानं करते आहे असं दिसतं. (जाता जाता १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत संततिनियमन साधनं व त्यामुळे स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य यांचं चित्रण आहे. १९६३ मध्ये त्यासंबंधीची सोपी साधनं बाजारात आली आहेत.) तिच्या लेखनातील अशी भविष्यवेध घेण्याची क्षमता अपूर्व आहे.
‘चिल्ड्रेन ऑफ व्हायोलन्स’ या पाच कादंबऱ्यांतील तिच्या काही व्यक्तिरेखा समान आहेत, पण कथानकात त्या त्या व्यक्तिरेखांचा विकास झाला असावा याचं भान तिनं ठेवलं आहे. मानवी जीवन व समाज सतत परिवर्तनशील असतो. तो स्थितिप्रिय आहे असं म्हटलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, घटनांचा परिणाम समाजात झिरपत राहतो. माणसं बदलतात असं तिचं सूत्र आहे. ही कादंबरी मालिका वीस वर्षांच्या काळात लिहिली गेली. मध्ये मध्ये इतर कादंबऱ्याही तिनं लिहिल्या, पण मार्था क्वेस्ट या नायिकेमध्ये पहिल्या कादंबरीपासून शेवटच्या ‘द फोर गेटेड सिटी’पर्यंत कसा बदल होत गेला ते तिनं दाखवलं आहे. त्याच वेळी त्या वीस वर्षांत घडलेले सामाजिक बदल, घटना यांचाही ताजा संदर्भ आहे. ‘द फोर गेटेड सिटी’मधून गूढवादाची सूचना मिळते आणि पुढे ‘ब्रिफिंग फॉर अ डिसेंट इनटू हेल’ या अंतर्मनाच्या अवकाशाचा शोध घेणाऱ्या कादंबरीची निर्मिती होते.
आपल्या लेखनाबद्दलची केलेली योजनानिश्चिती आणि वाचकांना काय सांगायचं आहे याची स्पष्ट कल्पना देण्यात लेसिंग यशस्वी होते. जीवनातील कुरूपतेकडे ती पाठ फिरवत नाही तसेच विचारप्रणालीचा स्वीकार केल्यानंतर जर भ्रमनिरास झाला, तर त्याबद्दल स्पष्टपणे सांगण्यासही ती कचरत नाही. तिचा स्वत:चा कम्युनिझम ते सुफीझम असा झालेला वैचारिक प्रवास, आधुनिक जगातील नव्या जीवनशैलीमुळे वाढणारे मानसिक गुंते (‘द गोल्डन नोटबुक’, ‘द गुड टेररिस्ट’) आणि उभ्या राहणाऱ्या शारीरिक समस्या (‘द फिफ्थ चाइल्ड’, ‘बेन कम्स टू द वर्ल्ड’) यांनी ती अस्वस्थ होई आणि त्यावरील खात्रीशीर उपाय सांगणं शक्य नसलं तरी त्यांची जाणीव करून देणं शक्य आहे, ते आपण करावं अशी तळमळ तिच्या मनात असे.
‘कॅनॉपस इन अ‍ॅरगॉस – अर्काइव्हज’ ही पाच कादंबऱ्यांची मालिका तिच्या अफाट कल्पनाशक्तीचा प्रत्यय देते. मानवी समाजाच्या आरंभापासूनचा इतिहास सांगत, रूपकांच्या आश्रयानं व्यवस्थेवर उपहासात्मक शैलीत ताशेरे झोडणाऱ्या मालिकेनं आणि तिच्या सखोल, परिश्रमपूर्वक संपादनानं वाचक चकित झाले.
मानवी नातेसंबंध, त्यातही स्त्री-पुरुष संबंध, त्यांचे वर्तनविषयक प्रश्न, याविषयी लिहिताना तिची मिस्कील पण स्पष्ट शैली आणि आकृतिबंधातली प्रयोगशीलता वेधक ठरते. लेसिंगच्या अशा विपुल ग्रंथसंपदेची व वैशिष्टय़ांची झलक देणंच शक्य आहे.
एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणारी लेसिंग मानवी जीवनाबद्दल ज्या आस्थेनं लिहिते आणि जो सकारात्मक दृष्टिकोन दाखवते तो पाहून या प्रतिभाशालिनीबद्दल आदरच वाटतो. ब्रिटिशांनी तिला देऊ केलेला ‘डेम’ हा किताब (त्यांच्या वसाहतवादी वृत्तीचा निषेध म्हणून) नाकारताना ‘आता एम्पायर आहेच कुठे मी ‘डेम’ व्हायला?’ असे म्हणणाऱ्या लेसिंगचा हाही पैलू तिच्या कादंबऱ्यांएवढाच मनाला भावतो.

Story img Loader