कलावंताच्या घडणीच्या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली. त्यामुळे साहजिकच अभिजात संगीताच्या कलावंतांचा एक वेगळा गट तयार झाला. त्यातून एका नव्या जातिधर्माची व्यवस्था लागण्यास सुरुवात झाली. अभिजात संगीत कुणी करायचे, याचे काही सामाजिक नियम तयार होऊ लागले आणि त्या काळातील समाजाच्या वरच्या स्तरातील लोकांनी हे संगीत आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
संगीतात जाती असतात, पण त्यांचा सामाजिक जाती-जमातींशी काही संबंध नसतो. स्वरांच्या जाती वेगळ्या आणि समाजातील वेगळ्या. धर्मच म्हणायचा, तर संगीताला फक्त सौंदर्याचाच धर्म असतो. ते निर्माण करणारा कोण, कुठला, असले प्रश्न रसिक कधी विचारत नाहीत. त्यांच्यासाठी स्वरांमधून मिळणाऱ्या आनंदाची अपूर्वाई अधिक महत्त्वाची. मानवाच्या मेंदूमध्ये जात, धर्म यांचे गणित शिरले, त्याआधीपासून संगीत जिवंत होते. पण समाजाच्या सगळ्या चौकटी नकळत संगीतालाही लागू होतच होत्या. त्यामुळे अभिजात संगीत करणारा समाज नेहमीच समाजातल्या वरच्या स्तरात राहिला. त्याचा रसिकवर्ग सर्व स्तरांत असला, तरीही त्या संगीताला सामाजिक जातिभेदाने ग्रासले गेले. हे सारे घडण्याच्या आधीच्या काळात येथील लोकसंगीत हे जनसंगीत राहिले होते. त्या संगीताला सर्वसमावेशकतेचा एक भक्कम आधार होता. ‘कलावंत’ या पदापर्यंत न पोहोचलेल्यांचेच ते संगीत होते. त्याचा दैनंदिन जगण्याशी, सामाजिक चालीरीतींशी अतिशय जवळचा संबंध होता. केवळ संगीत असे त्याचे स्वरूपही नव्हते. माणसाच्या जीवनाशी समरस होणारी ती एक अतिशय स्वाभाविक गोष्ट होती. त्यामुळे लोकसंगीत ही कोठल्याच एका वर्गाची मक्तेदारी नव्हती. कुणालाही त्यात सहभागी होण्याची मुभा होती आणि आनंद घेण्याची सोय होती. जनसंगीतात सहभागी होणाऱ्यांना ते कुठल्या जातीचे किंवा धर्माचे आहेत, याबद्दल प्रश्न विचारण्याचेही कारण नव्हते. समाजातील विशिष्ट वर्गाची ती मक्तेदारी नव्हती. त्याचा परिणाम ते सर्वदूर पसरण्यात आणि तळापर्यंत पोहोचण्यात झाला. आनंद असो वा दु:ख, कोणत्याही प्रसंगात समाजजीवनाला संगीताचा आधार होता. महाराष्ट्रच काय, पण भारतातील सगळ्या प्रांतांत असे त्या त्या भूमीतील सांस्कृतिकतेशी नाळ जोडणारे लोकसंगीत शतकानुशतके निर्माण होत राहिले. मागच्या पिढीतील असे लोकसंगीत थोडय़ाफार फरकाने पुढील पिढय़ांनी जपले. आजवर ही परंपरा अबाधितपणे आणि अखंडित सुरू राहिलेली दिसते.
जेव्हा संगीताचा लोकसंगीतातून अभिजाततेकडे प्रवास सुरू झाला त्या टप्प्यावर संगीताला एक नवे वळण प्राप्त झाले. ते संगीताच्या अभिव्यक्तीसाठी आणि संगीताच्या सामाजिक आशयासाठी अतिशय महत्त्वाचे होते. याचे कारण लोकसंगीतातून अभिजाततेकडे जाताना त्याच्या सौंदर्यखुणा बदलत होत्या. ते संगीत वरच्या पायरीवर जात असताना, त्याच्याशी कुणी निगडित व्हावे, याचे अलिखित नियमही आपोआप तयार होत होते. तेव्हाच्या समाजातील विशिष्ट स्तरात हळूहळू स्थिर होत असलेल्या अभिजात सौंदर्याच्या जाणिवा विकसित होत असताना घडून आलेले हे बदल हेतुत: होते की अजाणता, हे सांगणे कठीण आहे. मात्र ते स्पष्टपणे जाणवू लागले होते, एवढे मात्र खरे. लोकसंगीतात सहभागी होण्यात कुणालाच काही गैर वाटत नव्हते. विविध स्तरांतील लोक एकत्र येऊन ते संगीत उपभोगत होते. वरच्या पायरीवर जाताना ही सर्वसमावेशकता गळून पडणे स्वाभाविकही होते. कुणालाही सहजपणे गाता येणारे आणि सौंदर्याच्या विशिष्ट जाणिवा विकसित होणारे संगीत असे त्याचे ढोबळ स्वरूप हळूहळू सूक्ष्म होत गेले. त्यातून अभिजातता सिद्ध होत गेली आणि नव्या प्रयोगांना धुमारे फुटू लागले. त्याचा परिणाम असा झाला की, हे संगीत जनसंगीतापासून फारकत घेऊ लागले. कलावंताच्या घडणीच्या या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली. त्यामुळे साहजिकच अभिजात संगीताच्या कलावंतांचा एक वेगळा गट तयार झाला. त्यातून एका नव्या जातिधर्माची व्यवस्था लागण्यास सुरुवात झाली.
अभिजात संगीत कुणी करायचे, याचे काही सामाजिक नियम तयार होऊ लागले आणि त्या काळातील समाजाच्या वरच्या स्तरातील लोकांनी हे संगीत आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. समाजातील प्रत्येक घटकाला सोपवून दिलेल्या कामात संगीत नेहमीच अभिजनांच्या आधिपत्याखाली राहील, अशा या व्यवस्थेने संगीतात जनसंगीत आणि अभिजात अशी एक समांतर व्यवस्था तयार झाली. बहुजनांपेक्षा अभिजनांकडेच या अभिजाततेचा मक्ता राहिल्याने नकळत अनेक नवे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक ठरले. ते सामाजिक पातळीवर कधीच दृश्य स्वरूपात दिसले नाहीत, तरीही सुप्तपणे ते समाजातील सर्व स्तरांत खडखडत राहिले. समाजातील सर्व घटकांना अभिजात संगीतात सारखीच संधी मिळावी, अशी व्यवस्था नसल्याने काही गट आपोआप बाहेर फेकले गेले.
सर्जनशीलता, प्रज्ञा आणि प्रतिभा या विशिष्ट वर्गातच असतात, अशी आभासात्मक परिस्थिती निर्माण झाली. त्या काळातील राजेशाह्य़ांनी त्यात सामाजिक उतरंड रचण्यातही मदत केली. राजदरबारात सर्वाना प्रवेश नसे, त्यामुळे तेथे संगीत सादर करण्याची मुभा सरसकट कुणालाही मिळणे दुरापास्त असे. एका बाजूने वर्णव्यवस्थेच्या विरोधात समाजात बंडाची भावना तयार होत असताना, तेव्हाच्या उच्चवर्णीयांनी संगीत मात्र आपल्या हातून जाऊ दिले नाही. राजा हाच सर्वेसर्वा असल्याने आणि त्याचाच शब्द अंतिम असल्याने प्रजेने हे सारे मान्य करणे ही सहजगोष्ट होती. संगीतात जेव्हा अतिशय ताकदीचे प्रयोग होत होते, त्यांचे प्रथम साक्षीदार होण्याचे भाग्य राजाला मिळत असे आणि त्याच्या इच्छेशिवाय किंवा परवानगीशिवाय या प्रयोगांना बहुमान्यता मिळणे शक्य नसे. अशाही स्थितीत भारतीय अभिजात संगीताने कमालीच्या ईष्र्येने स्वत:मध्ये बदल घडवण्याचे काम सुरू ठेवले. ज्या कलावंताला प्रतिभेचे दान होते, त्याच्याच प्रयोगांना राजमान्यता मिळत असली पाहिजे, असे इतिहासात डोकावल्यावर दिसते. अन्यथा, कमअस्सल संगीतालाच अस्सल समजण्याची चूक झाली असती. जे संगीत टिकून राहिले, ते त्यातील अस्सलपणाच्या कसोटीवर. देवळातले संगीत दरबारात येणे आणि त्याला मान्यता मिळणे ही अजिबात सोपी घटना नव्हती. स्वान्त: सुखाय असलेले हे संगीत समाजातील काही गटांपर्यंत पोहोचू लागल्यानेही त्यात काही मूलभूत बदल घडून आले असणे शक्य आहे. स्वत:च्या आनंदापलीकडे ते ऐकणाऱ्यालाही तेवढाच आनंद मिळण्याची ही प्रक्रिया संगीताच्या प्रसारामुळे घडून आली. त्यामुळे त्यामध्ये होणाऱ्या बदलांमागे ‘श्रोता’ या नव्याने जन्माला आलेल्या वर्गाचा विचार होऊ लागला. अभिजनांच्या कवेतून हे संगीत सुटण्यासाठी या व्यवस्थेत बदल झाले असतीलच, तर ते भारतावरील मुस्लिमांच्या आक्रमणानंतर. भारतात मुस्लिमांनी आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर साहजिकपणे एका नव्या संगीताचा प्रवेश येथील संगीत-विश्वात झाला. त्या नव्या संगीताची जातकुळी आणि मूलधर्म भारतीय परंपरेशी नाळ जोडणारी होती. तरीही येथील संगीतात या नव्याने प्रवेश केलेल्या संगीताचे मिसळणे केवळ राजसत्तेच्या धाकापोटी झाले, असे म्हणणे अकलात्मक ठरू शकेल. त्या काळातील भारतीय संगीतातील सगळ्या कलावंतांनी हे आव्हान लीलया पेलले आणि एका नव्या संगीताच्या उभारणीत फार मोलाचे योगदान दिले.
संगीताचा धर्माशी असलेला संबंध केवळ धार्मिक व्यवहारांपुरता होता. चर्चमधील प्रार्थना असो, मशिदीतील बांग असो की देवळातील आरती असो; त्याचा संबंध सांगीतिक घडामोडींशी होता, कारण जनसंगीताने प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त केले होते. संगीताला वगळून सामान्यांपर्यंत पोहोचणे दुरापास्त आहे, ही कुणाच्याही लक्षात येणारी गोष्ट होती. त्यामुळे धर्मकारणात संगीताने प्रवेश केला. तेथून ते राजकारणापर्यंत पोहोचणे अधिक सुकर झाले. राजकारणातील सत्ताकारणापासून संगीताने आपली सुटका करून घेण्यासाठी समाजात मूलभूत बदल घडून येणे आवश्यक होते. जगण्यातील आधुनिकतेचा परिणाम या बदलांना पूरक ठरत होता आणि त्यामुळे विचार करण्याच्या पद्धतीतही महत्त्वाचे बदल घडून येत होते. त्यातूनच एका विशिष्ट भूभागाची सांस्कृतिक ठेव हे संगीताचे मूळचे स्वरूप बदलू लागले. त्याला पंख फुटू लागले आणि ते सर्वदूर पोहोचण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ लागला. नव्या प्रयोगांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक होती. अन्य कलावंतांच्या प्रतिभेने दिपून जाणे आणि त्यातून नवसर्जनाची प्रेरणा मिळणे अशा घटना त्यामुळेच घडू लागल्या. संगीताचा एक नवा धर्म स्थापन होत असतानाही राजसत्तेच्या होकाराची जरब मात्र तोपर्यंत सुटली नव्हती. याचे कारण दरबारातून बाहेर पडून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या संगीताच्या धडपडीला तोवर पुरेसे यश मिळत नव्हते. ते मिळण्यासाठी समाजातील प्रचंड उलथापालथीचीच गरज होती. ती घडून आली आणि संगीताने गगनालाच गवसणी घालण्याचा पराक्रम केला.
संगीतातील जातिधर्म
कलावंताच्या घडणीच्या काळात प्रतिभा आणि सर्जनशीलता यांच्या साह्य़ाने प्रयोगशीलता आकाराला येऊ लागली.
आणखी वाचा
First published on: 22-11-2014 at 01:49 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste and religion in music